मेट्रोच्या सामंजस्य कराराला ‘ग्रीन सिग्नल’; ठाण्यातील मेट्रोसाठी ४५१५ कोटींचे उभाणार कर्ज
By अजित मांडके | Updated: January 9, 2025 11:26 IST2025-01-09T11:25:47+5:302025-01-09T11:26:10+5:30
पुढील पाच वर्षांत हा प्रकल्प कार्यान्वित करावा लागणार आहे.

मेट्रोच्या सामंजस्य कराराला ‘ग्रीन सिग्नल’; ठाण्यातील मेट्रोसाठी ४५१५ कोटींचे उभाणार कर्ज
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : अंतर्गत ठाणेमेट्रो प्रकल्पाला मागील वर्षी केंद्रीय मंत्रिमंडळाने परवानगी दिल्यानंतर राज्य शासनाने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी करावयाच्या त्रिपक्षीय सामंजस्य करारनाम्यास मंगळवारी मान्यता दिली. या कामासाठी १२ हजार २०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्चाचा भार मुख्यत्वे केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून उचलला जाणार असून ठाणे महापालिकाही खारीचा वाटा उचलणार आहे. प्रकल्पासाठी विविध माध्यमातून ४ हजार ५१५ कोंटीचे कर्ज घेतले जाणार आहे. या कामाची जबाबदारी ही महामेट्रोवर सोपविण्यात आली असून, पुढील पाच वर्षांत हा प्रकल्प कार्यान्वित करावा लागणार आहे.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून २०१७ मध्ये अंतर्गत मेट्रोचे स्वप्न पाहण्यात आले होते. त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा केला होता. त्यावेळेस याचा अंदाजित खर्च हा १३ हजार कोटींच्या घरात जाणार होता; परंतु हा खर्च पालिकेला पेलवणारा नव्हता. त्यामुळे या खर्चाचा भार ‘एमएमआरडीए’ने उचलावा, असेही निश्चित करण्यात आले होते; परंतु मधल्या काळात मेट्रो की एलआरटी? अशा पेचात हा प्रकल्प अडकला. वाढीव खर्चामुळे केंद्राने यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेला सुचविले होते.
मेट्रो ४ आणि ५ ला जोडणार
शासनावर वाढणारा वित्तीय भार महामेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. यांनी स्थानिक प्राधिकरण, शासकीय-निमशासकीय संस्थांकडील जमिनी उपलब्ध करून घेऊन अशा जमिनी विकसित करून टीडीआर, इतर अनुषंगिक माध्यमातून निर्माण होणाऱ्या आर्थिक स्त्रोतांतून भागविण्यास मान्यता देण्यात आली. अंतर्गत मेट्रो जात असलेल्या मेट्रो ४ आणि ५ या मार्गांना जोडली जाणार असल्याचे पालिकेने सांगितले. मेट्रोची काही स्थानकेही मेट्रो चार आणि पाचला जाेडली जाणार आहेत.
असा असेल खर्चाचा वाटा
केंद्र व राज्य सरकारचा हिस्सा प्रत्येकी १ हजार १५१.१३ कोटी असणार आहे. तसेच केंद्र व राज्य शासनाला ३५४.११ कोटी प्रत्येकी टॅक्स मोजावा लागणार आहे. याशिवाय ठाणे महापालिकेला २०० कोटींचा भार उचलावा लागणार आहे.
...असा आहे मेट्रो प्रकल्प
- २९ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात २६ किलोमीटर लांबीचा मार्ग हा उन्नत असून तीन किलोमीटरचा मार्ग भूमिगत आहे. यात २२ स्थानके असणार आहेत.
- एक स्थानक हे ठाणे रेल्वेस्टेशनला जोडले जाणार आहे. मुलुंड, ठाण्यामध्ये होऊ घातलेल्या नवीन ठाणे स्टेशनला अंतर्गत मेट्रोचे स्थानक जोडले जाणार असल्याने फायदा प्रवाशांना होणार आहे.
- अंतर्गत मेट्रो ही ठाणे स्टेशन, नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरीपाडा, हिरानंदानी इस्टेट आदी भागांतून जाणार असल्याने रहिवाशांसह येथील व्यापारी, उद्योग आस्थापनांना मेट्रोचा फायदा होणार आहे.