मेट्रोचे अधिकारी मुख्यमंत्र्यांना खोटे बोलायला लावतात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 05:36 AM2019-09-19T05:36:58+5:302019-09-19T05:37:23+5:30
आरे येथील प्रस्तावित मेट्रो कारशेडच्या प्रकरणात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पाेरेशनच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले.
अंबरनाथ : आरे येथील प्रस्तावित मेट्रो कारशेडच्या प्रकरणात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पाेरेशनच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. हे अधिकारी मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देऊन त्यांना खोटे बोलायला लावत असल्याचा आरोप त्यांनी अंबरनाथमध्ये जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केला.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील जनआशीर्वाद यात्रेला आदित्य ठाकरे यांनी अंबरनाथमधून सुरुवात केली. बुधवारी सकाळी ११ वाजता फॉरेस्ट नाका येथून यात्रा सुरू झाली. यात्रेच्या मार्गावर नागरिक आणि कार्यकर्त्यांची भेट घेत ते शिवाजी चौकात आले. येथे त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आरे येथील कारशेडमुळे होणाºया पर्यावरणाच्या हानीसाठी एमएमआरसीएलच्या अधिकाऱ्यांना दोषी धरले. हे अधिकारी मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देत असल्याचा आरोप त्यांनी केला.
नाणार येथील प्रकल्पाच्या मुद्द्यावर शिवसेना भूमिपुत्रांच्या बाजूने आहे. मात्र, त्याचा अर्थ असाही नाही की आम्हाला विकास नको; पण पर्यावरणाची हानी करून कोणताच विकास नको. भूमिपुत्रांचा विरोध असेल तर तिथे आमचाही विरोध असेल. त्यातून मार्ग काढण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. नेत्यांच्या वाढत्या पक्षांतराबाबत बोलताना निवडणुकीत नेत्यांविषयी चर्चा करण्याऐवजी नागरिकांच्या प्रश्नांवर विचार करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. स्वत:च्या निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी असून लोकांचा आशीर्वाद घेतल्यानंतर आपण त्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
>विद्यार्थी दोन तास ताटकळत
उल्हासनगर : जनआशीर्वाद यात्रेसाठी उल्हासनगरात बुधवारी आलेले आदित्य ठाकरे हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार होते. त्यासाठी येथील दोन शाळांमध्ये विद्यार्थी जवळपास दोन तास ताटकळत बसले होते. मात्र ऐनवेळी त्यांचा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. यात्रेच्या मार्गावरील खड्डे रातोरात बुजविण्यात आले. या वेळी ठाकरे यांनी थायरियासिंघ दरबारच्या वतीने शेणापासून लाकूड बनविण्याच्या कारखान्याचे उद्घाटन केले. येथे बनविलेले लाकूड स्मशानभूमीला मोफत देण्यात येणार आहे. उल्हासनगरात शिवसैनिकांनी यात्रेच्या मार्गात ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.