भिवंडीत मेट्रोचे नियोजन शून्य काम; रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये मनसेचे मच्छि पकडो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 06:13 PM2020-10-14T18:13:32+5:302020-10-14T18:13:54+5:30
मेट्रो सह या मार्गावर असलेल्या टोल कंपनीने देखील रस्त्याच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष केल्याने या मार्गावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत.
- नितिन पंडीत
भिवंडी: भिवंडीतील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी शासनाने ठाणे भिवंडी कल्याण असा मेट्रो मार्ग मंजूर केला असून सध्या या मेट्रो कामाची सुरुवात देखील झाली आहे. मात्र मेट्रोच्या नियोजन शून्य कारभारामुळे ठाणे भिवंडी मार्गावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
मेट्रो सह या मार्गावर असलेल्या टोल कंपनीने देखील रस्त्याच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष केल्याने या मार्गावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून वाहन चालवितांना प्रवाशांसह नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे अशी वारंवार मागणी करूनही टोल कंपनीसह मेट्रो प्रशासन व संबंधित ठेकेदार रस्त्याच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करीत असल्याने बुधवारी मनसेच्या वतीने या मार्गावरील पूर्णा येथे पाणी साचलेल्या खड्ड्यांमध्ये उतरून मच्छि पकडो असे अनोखे आंदोलन केले.
मनसे कार्यकर्त्यांनी मच्छि पकडण्यासाठी वापरले जाणारे जाळे घेऊन पाणी साचलेल्या खड्डेमय रस्त्यांमध्ये हे मच्छि पकडो आंदोलन केले. या अनोख्या आंदोलनाला प्रव प्रवासी प्रवाशांसह स्थानिक नागरिकांनी देखील पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान या आंदोलना प्रसंगी मनसेने मेट्रो रेल्वे प्रकल्प प्रशासन व ठेकेदार तसेच व एम एम आर डी ए प्रशासनाने तात्काळ नागरिकांना व प्रवाशांना रहदारीसाठी हा रस्ता सुस्थितीत उपलब्ध करून घ्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पेक्षा ही तिव्र आंदोलन करेल असा इशारा मनसेने दिला आहे. या आंदोलनाप्रसंगी मनसेचे जिल्हा सचिव संजय पाटिल, तालुका अध्यक्ष शिवनाथ भगत, वाहतूक सेना तालुका अध्यक्ष संतोष म्हात्रे, कुलेश तरे, जगदीप घरत ,रुपेश घरत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.