तळोजा पर्यंत आलेली मेट्रो रेल्वे डोंबिवली ते कल्याण पर्यंत सुरु करा, आमदार सुभाष भोईर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 05:58 PM2017-12-22T17:58:46+5:302017-12-22T17:58:49+5:30
एमएमआरडीए व सिडकोच्या माध्यमातून तळोजा पर्यंत आलेली मेट्रो रेल्वे दहिसर मोरी, कल्याणफाटा मार्गे दिवा, डोंबिवली ते कल्याण
डोंबिवली: एमएमआरडीए व सिडकोच्या माध्यमातून तळोजा पर्यंत आलेली मेट्रो रेल्वे दहिसर मोरी, कल्याणफाटा मार्गे दिवा, डोंबिवली ते कल्याण पर्यंत सुरु करण्याची मागणी आमदार सुभाष भोईर यांनी याकरिता आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेत मेट्रो रेल्वे सुरु करण्याची मागणी केली.
तळोजा ते कल्याणफाटा दिवा, डोंबिवली कल्याण मेट्रो रेल्वे मागार्चे सर्वेक्षण देखील झाले आहे. तळोजा एमआयडीसीमध्ये मोठमोठे कारखाने असून डोंबिवली व कल्याण ग्रामीण परिसरातून रोजंदारीकरिता तसेच शाळा, कॉलेज करीता येणारा विद्यार्थी वर्ग येथे मोठ्या प्रमाणात रोज हजारोंच्या संख्येने प्रवास करीत असतो. तळोजा ते कल्याण फाटा मार्गे डोंबिवली, कल्याण जंक्शन पर्यंत मेट्रो ट्रेन सेवा सुरु झाल्यास शहरे एकमेकांना जवळ येऊन त्यांचा विकास होईल.
मध्य रेल्वेचे दिवा व कल्याण हे महत्वाचे दोन जंक्शन स्टेशन असून या दोन्ही स्टेशनवरती लांब पल्ल्याच्या जवळपास सर्वच गाड्या थांबतात. त्यामुळे दिवा व कल्याण या दोन शहरांना कनेक्टीव्हीटी असलेला तळोजा ते दहिसर मोरी ते कल्याणफाटा ते दिवा, डोंबिवली ते कल्याण अशी मेट्रो रेल्वे सुरु झाल्यास उपेक्षीत असलेला ग्रामीण परिसर व इतर छोटी शहरे एकमेकांशी जोडली जातील. तळोजा ते कल्याणफाटा मार्गे दिवा-डोंबिवली-कल्याण मेट्रो रेल्वे सुरु करुन त्याची स्थानके तळोजा, रोहिंजण, दहिसर, दहिसर मोरी, उत्त्तरशिव, कल्याणफाटा, शिळ, खार्डी, दिवा, डोंबिवली, कल्याण अशी द्यावी. तसेच कल्याण कडील दिशेला कल्याणफाटा, पडले, देसाई नाका, निळजे, काटई, मानपाडा, सोनारपाडा, विको नाका, सुचक नाका, चक्कीनाका, पत्रीपूल, तिसगाव, कल्याण अशी स्थानके द्यावीत, अशी या मागणी केली.