मेट्रो येणार; ऑक्सिजनचे कोठार उद्ध्वस्त होणार
By संदीप प्रधान | Updated: March 31, 2025 13:20 IST2025-03-31T13:20:13+5:302025-03-31T13:20:40+5:30
Thane News: महाराष्ट्रातील राज्यकर्ते आणि नियोजन मयांचा यापूर्वीही सूतराम संबंध नव्हता व भविष्यातही तो असण्याची शक्यता दिसत नाही. जगभरातील प्रगत देशांत सार्वजनिक आरोग्य, वाहतूक, शिक्षण व्यवस्थेवर भर दिला जातो. या सेवा तिकडे आपल्याकडील खासगी सेवांपेक्षा अधिक उच्च दर्जाच्या असतात.

मेट्रो येणार; ऑक्सिजनचे कोठार उद्ध्वस्त होणार
- संदीप प्रधान
(वरिष्ठ सहायक संपादक)
महाराष्ट्रातील राज्यकर्ते आणि नियोजन मयांचा यापूर्वीही सूतराम संबंध नव्हता व भविष्यातही तो असण्याची शक्यता दिसत नाही. जगभरातील प्रगत देशांत सार्वजनिक आरोग्य, वाहतूक, शिक्षण व्यवस्थेवर भर दिला जातो. या सेवा तिकडे आपल्याकडील खासगी सेवांपेक्षा अधिक उच्च दर्जाच्या असतात. मात्र, आपल्याकडे खासगी वाहने कशी वाढतील, यासाठी दोन दशकांत प्रयत्न केले. आता मेट्रोच्या उभारणीतून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे वाटचाल सुरू आहे. परंतु, दोन ते अडीच दशकांत बांधकाम व्यावसायिकांनी इंच इंच जमीन बांधायला घेतल्याने मेट्रो कारशेडसाठी जमीन उपलब्ध होत नाही. त्यामुळे अगोदर आरेचे व आता उत्तन येथील जंगल उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र सुरू आहे. त्यामुळे मेट्रो येणार; पण ऑक्सिजनचे कोठार उद्ध्वस्त होणार आहे.
राज्य सरकारने १९८० व ९० च्या दशकात मेट्रोची उभारणी सुरू करायला हवी होती. त्याचवेळी मेट्रोचे जाळे उभे केले असते तर मध्य व पश्चिम रेल्वेला पर्याय उभा राहिला असता. मेट्रो एव्हाना दहिसर-बदलापूरपर्यंत गेली असती. मेट्रोच्या कारशेडवरून भाजप व उद्धवसेना यांच्यात मानापमान नाट्य रंगले. अखेर आरे कॉलनीतील २९०० झाडे तोडून कारशेड उभी केली जात आहे. पर्यायी झाडे लावतोय वगैरे खुलासे एमएमआरडीएचे अधिकारी करतील. परंतु, गेल्या पाच-पन्नास वर्षापासून उभी असलेली झाडे, त्याच्या आजूबाजूला असलेला पक्षी, प्राण्यांचा अधिवास संपुष्टात आणायचा व त्या बदल्यात कुठेतरी झाडे लावल्याचे अहवाल तोंडावर फेकायचे ही शुद्ध धूळफेक आहे.
भाईदरकडे येणाऱ्या मेट्रोचे शेवटचे स्थानक सुभाषचंद्र बोस मैदान हे असेल. या परिसरातील जमिनी अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी खरेदी केल्या आहेत. येथील फ्लॅटचे दर चौरस फुटाला १२ ते १५ हजार रुपये आहेत. येथील राई, मुर्धा, मोर्वा गावांत कारशेड प्रस्तावित होती. परंतु, येथील स्थानिकांच्या जमिनींना सोन्याचा भाव बांधकाम व्यावसायिक देत आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांच्या इशाऱ्यावरून गावकऱ्यांनी कारशेडला विरोध केल्याने या शेवटच्या स्थानकापासून सात ते आठ किमी दूर डोंगरावरील ६० हेक्टर जमिनीत ही कारशेड होणार आहे. एवढी प्रचंड जमीन कारशेडसाठी का हवी, हेही कोडे आहे. येथील १२ हजार ४०० झाडांचा बळी दिला जाणार आहे. यात अनेक औषधी व दैनंदिन वापरासाठी उपयुक्त झाडांचा समावेश आहे. दाट जंगलाच्या या परिसरात बिबटे, कोल्हे, रानडुक्कर व वेगवेगळ्या पक्ष्यांच्या प्रजातींचे वास्तव्य आहे. हे जंगल आणि किनारपट्टीचे कांदळवन मीरा-भाईंदर व परिसराला ऑक्सिजनचा पुरवठा करणारी कोठारे आहेत. आरेसारखाच हाही निर्णय पूर्णत्वाला नेला जाईल व स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली जाईल.