ठाण्यातील महानगरांची पाण्याची चिंता मिटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:49 AM2021-09-07T04:49:26+5:302021-09-07T04:49:26+5:30
अंबरनाथ: संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणात ९८ टक्के पाणीसाठा तयार झाल्याने साेमवारी धरणाच्या अकरा स्वयंचलित दरवाजांपैकी तीन ...
अंबरनाथ: संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणात ९८ टक्के पाणीसाठा तयार झाल्याने साेमवारी धरणाच्या अकरा स्वयंचलित दरवाजांपैकी तीन दरवाजे उघडले आहेत. या तीन दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने धरणाखालील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत ते १००% भरेल असा अंदाज एमआयडीसीने व्यक्त केला आहे
संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण अखेर काठोकाठ भरले आहे. बारवी धरण क्षेत्रात जुलै महिनाअखेर झालेल्या मुसळधार पावसाने हे धरण ५० टक्क्यांवरून थेट ८५ टक्क्यांपर्यंत भरले होते; मात्र संपूर्ण ऑगस्ट महिना पावसाने दडी मारल्यामुळे धरण भरू शकले नाही. ते २०२० मध्ये ३१ ऑगस्ट रोजी ओव्हरफ्लो झाले होते. गेल्या आठवड्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता हे धरण ९८ टक्के भरले असून या धरणातील अकरा स्वयंचलित दरवाजांपैकी तीन दरवाजे हे आपोआप उघडले आहेत. त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. गेट नंबर सात, आठ आणि नऊ हे तीन दरवाजे उघडले असून येत्या दोन दिवसांत हे धरण १००% भरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या महानगरांना होतो पाणीपुरवठा
बारवी धरणातून ठाणे, मीरा भाईंदर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर,नवी मुंबई या महापालिकांसह अंबरनाथ आणि बदलापूर या नगरपालिका तसेच एमआयडीसी आणि स्टेम या प्राधिकरणांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या धरणाच्या पाणीसाठ्यावरच ठाणे जिल्ह्याची तहान अवलंबून असते.
----------------------------------------------