सेफ्टी ऑडिटमध्ये मेट्रोपॉलिटन कंपनी ठरली होती उत्तम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 03:44 AM2020-02-19T03:44:38+5:302020-02-19T03:44:51+5:30
औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचा दावा : मुख्यमंत्र्यांचे शब्द ठरले खरे
मुरलीधर भवार
कल्याण : डोंबिवलीतील नागरी वस्तीशेजारी घातक रसायनांचे कारखाने सुरु ठेवून तुम्ही मरण पोसताय का, असा खडा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंधरा दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर धोकादायक व अतिधोकादायक कंपन्यांचे सर्वेक्षण सुरु असतानाच मेट्रोपॉलिटन एक्झिम केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याने डोंबिवलीकरांच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या मरणाची मंगळवारी साक्ष पटली. ज्या कंपनीला आग लागली त्या कंपनीचे सुरक्षा आॅडीट केले होते. त्यामुळे हा केवळ अपघात असल्याचे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
डोंबिवलीतील केमिकल प्रदूषणामुळे गुलाबी झालेल्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुमारे पंधरा दिवसांपूर्वी आले होते. तेव्हा त्यांनी येथील रसायनांच्या कारखान्यांची बेफिकीरी पाहून सुरक्षेची उपाययोजना करायची नसल्यास कंपन्यांना टाळे ठोका, असा इशारा दिला होता. अतिधोकादायक कंपन्यांना इतरत्र हलवण्याची कार्यवाही सुरु करा असे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अग्निशमन दल, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय अधिकाऱ्यांची एक समिती गठीत होणार होती.
या संदर्भात औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या कल्याण कार्यालयातील सहसंचालक विनायक लोेंढे यांनी सांगितले की, समिती गठीत केली असून तिची पहिली बैठक मागच्या सोमवारी पार पडली. यात ठरल्यानुसार, कंपन्यांचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. कोणत्या कंपन्यांमध्ये कोणते उत्पादन घेतले जाते. त्याकरिता कोणता कच्चा माल वापरला जातो. कंपन्यांमध्ये किती कामगार आहेत. शेजारी नागरी वस्ती आहे का नाही ? ही माहिती गोळा केली जात आहे. हे सर्वेक्षण नेमके किती वेळेत पूर्ण होईल याविषयी लागलीच काही सांगता येणार नाही. मात्र आजच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तातडीने सर्वेक्षण पूर्ण करुन अहवाल सादर केला जाईल, असे ते म्हणाले. ज्या मेट्रोपॉलिटन एक्झिम कंपनीत आग लागली त्याचे सेफ्टी आॅडीट केल्याचे लोंढे यांनी सांगितले. ही कंपनी अधून मधून सुरक्षिततेचे व आपत्कालीन परिस्थितीत काय करायचे याचे मॉकड्रीलही करीत होती. कंपनीत लागलेली आग हा एक अपघात आहे. इतकेच म्हणता येईल.
माहिती अधिकार कार्यकर्ते राजू नलावडे यांनी डोंबिवली एमआयडीसी परिसरातील अतिधोकादायक पाच कंपन्यांची यादी उघड केली होती. त्यात आज आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या कंपनीचा समावेश होता. स्फोटासारखे आवाज येत असल्याने भयभीत झालेला तरुण दत्ता वाटोरे याने सांगितले की, भीषण आगीच्या घटनेमुळे आम्हाला प्रोबेस स्फोटाची आठवण झाली.
प्रोबेस स्फोटाची आठवण
डोंबिवलीतील नागरीकांना मंगळवारी प्रोबेस कंपनीतील भीषण स्फोटाची आठवण झाली. मे २०१६ मध्ये प्रोबेस कंपनीत भीषण स्फोट झाला होता. मंगळवारी केमिकलच्या ड्रमचे एका मागोमाग ५० हून अधिक स्फोट झाले. प्रोबेस कंपनीत एका पत्र्याच्या शेडचे वेल्डिंग सुरु होते. त्याची ठिणगी पडली आणि मोठा स्फोट झाला होता. मंगळवारी तसेच मोठे संकट चालून आले होते. मात्र जीवितहानी टळली. प्रोबेस स्फोटाच्या चौकशीत कंपनीत अत्यंत ज्वलनशील रसायनांचा साठा असल्याचे उघड झाले होते. स्फोटाच्या चौकशी अहवालात ज्या काही शिफारसी करण्यात आल्या त्याकडे डोळेझाक केली गेली. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती घडली आहे.