ठाण्याच्या कारागृहात ‘मी टू’; अधीक्षकांविरुद्ध कॉन्स्टेबलची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 06:36 AM2018-10-20T06:36:19+5:302018-10-20T06:37:25+5:30
कारागृहातील दुसरा प्रकार : अधीक्षकांविरुद्ध कॉन्स्टेबलची तक्रार
ठाणे : ठाण्याचे प्रभारी कारागृह अधीक्षक नितीन वायचळ यांच्याविरुद्ध कारागृहाच्या महिला कॉन्स्टेबलने मानसिक आणि शारीरिक छळवणुकीची तक्रार विशाखा समितीकडे केली आहे. कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजवर्धन यांच्याकडेही या महिलेने याबाबतची तक्रार केली आहे. सध्या देशभरात ‘मी टू’चे वादळ उठले असताना, उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर झालेल्या या आरोपांमुळे कारागृह वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
कारागृहातून सुटलेल्या काही महिला कैद्यांबरोबर तुझे संबंध आहेत, हे कारण दाखवून, तसेच ‘तुला पाहिजे तशी ड्युटी देतो, मी सांगेन तसे कर,’ असे सूचक विधान करून आपल्याशी गेल्या तीन वर्षांपासून प्रभारी अधीक्षक वायचळ यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप या कर्मचारी तरुणीने केला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीचे अधीक्षक हिरालाल जाधव यांनादेखील एका महिला कर्मचाऱयाच्या विनयभंग प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तडकाफडकी निलंबित केले होते. जाधव यांच्याविरुद्धही ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यांनी अटकपूर्व जामीनही घेतला होता. त्यांच्या जागी कारागृहाचे उपअधीक्षक वायचळ यांच्याकडे प्रभारी अधीक्षकपदाची सूत्रे आली, परंतु वायचळ हे गेल्या पाच वर्षांपासून एकाच ठिकाणी असून, त्यांनी अनेकदा आपल्याला क्षुल्लक कारणावरूनही त्रास दिला. अगदी सॅल्यूट करताना ‘कसा पाय ठेवला, इथपासून हवी तशी ड्युटी देतो, पण तू माझ्याबरोबर राहा, मी सांगेन तसे कर,’ अशा पातळीवर त्यांनी आपली छळवणूक केल्याचे गंभीर आरोप या कॉन्स्टेबल तरुणीने केले आहेत. कारागृहातून सुटलेल्या कैद्यांशी तर माझेच नव्हे, तर अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे संबंध येतात. हे आपण पुराव्यानिशी सांगू शकू. कारागृहाबाहेर आपले वैयक्तिक कोणाशी संबंध असू शकतात, पण त्यावरून कोणी अधिकारी छळवणूक करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. याबाबत, रीतसर पोलिसांत तक्रार करणार असल्याचेही तिने सांगितले.
दरम्यान, विशाखा समितीकडे या महिला कर्मचाºयाची तक्रार असल्याने यासंबंधी चौकशी सुुरू आहे. या चौकशीनंतर तिने तक्रार दिल्यास गुन्हा दाखल करणार असल्याचे ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांनी सांगितले.