म्हाडा भिवंडीत २० हजार घरांची उभारणी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:48 AM2021-09-04T04:48:28+5:302021-09-04T04:48:28+5:30
भिवंडी : जिल्ह्यातील विविध शहरांत म्हाडाची घरे आहेत; मात्र भिवंडीत पुरेशी घरे नसल्याने महापालिका प्रशासनाने भूखंड उपलब्ध करून दिल्यास ...
भिवंडी : जिल्ह्यातील विविध शहरांत म्हाडाची घरे आहेत; मात्र भिवंडीत पुरेशी घरे नसल्याने महापालिका प्रशासनाने भूखंड उपलब्ध करून दिल्यास म्हाडाच्या माध्यमातून २० हजार घरांची उभारणी करणार असल्याची घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी भिवंडीत पत्रकार परिषदेत केली.
मंत्री आव्हाड हे भिवंडी पालिका आयुक्तांच्या भेटीला पालिका मुख्यालयात आले होते. भिवंडी महापालिका क्षेत्रात शेकडोच्या संख्येने धोकादायक इमारतीसह अनधिकृत आहेत. त्यामुळे दरवर्षीच पावसाळ्यात अश्या इमारती कोसळून दुर्घटना घडत असून, यात आतापर्यंत अनेकांचे जीव गेले आहेत. आजही एक मजली अनधिकृत इमारत कोसळून त्यामध्ये एका जणांचा बळी गेला तर सात जण जखमी झाले. यातील बळी गेलेल्या व्यक्तीच्या वारसांना पाच लाखांची आर्थिक मदत जाहीर केली. तर जखमींना ५० हजार रुपयांसह त्यांच्यावरील उपचारखर्च महापालिका प्रशासन करणार असल्याचेही सांगितले. आव्हाड येणार असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मनपा प्रवेशद्वारावर एकच गर्दी केली होती. त्यांच्या स्वागतासाठी साईबाबा ते महापालिकेपर्यंत काढलेल्या स्वागतपर बाईक रॅलीमुळे शहरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.