CoronaVirus कोरोनाग्रस्तांसाठी म्हाडाची १४ हजार घरे वापरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 06:03 AM2020-04-07T06:03:37+5:302020-04-07T06:06:33+5:30
गृहनिर्माण विभाग; जितेंद्र आव्हाड यांची माहिती
ठाणे : कोरोना रूग्णांना आयसोलेट (विलगीकरण) आणि क्वारंटाईन करण्यासाठी गृहनिर्माण खात्याच्या ताब्यात असलेली सुमारे १४ हजार घरे उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी केली.
महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. राज्याच्या आरोग्य खात्याने चोख कामिगरी बजावून अनेक ठिकाणी कोरोनावर उपचार करणाऱ्या रूग्णालयांची व्यवस्था केली आहे. कोरोनाविरोधातील या लढ्यात आता गृहनिर्माण खातेही ताकदीने उतरले आहे. देशातील सगळ्यात मोठा आयसोलेशन आणि क्वारंटाईन झोन महाराष्ट्राच्या गृहनिर्माण खात्याने उभा करण्याची तयारी केली आहे. रुग्णांना आयसोलेट किंवा क्वारंटाईन करण्यासाठी ही घरे सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
सोमवारी त्यांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवत गृहनिर्माण खात्याच्या अधिकात्र्यांची बैठक घेतली. या बैठकीला गृहनिर्माण विभागाचे अधिकारी अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर आणि म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, मुंबई बोर्डाचे अध्यक्ष राधाकृष्ण हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये आव्हाड यांनी प्रतिकूल परिस्थितीत गृहनिर्माण खाते काय काम करू शकते, याचा आढावा घेतला. यावेळी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना रूग्णांना आरसोलेट तसेच क्वारंटाईन करण्यासाठी तत्काळ १४ हजार घरे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा केली.
गरज भासल्यास
आणखी दहा हजार घरे
जर रु ग्णालयांची कमतरता भासत असेल तर गृहनिर्माण विभागाने मुंबईकरांच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी या घरांची तयारी ठेवली आहे. या घरांचा रुग्ण क्वारंटाईन करण्यासाठी वापर करता येऊ शकेल. अगदीच वेळ हाताच्या बाहेर जायला आली तर आणखी यामध्ये १० हजार घरांची व्यवस्थाही करू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.