म्हारळ सर्वात मोठी तर चिरड सर्वात लहान ग्रामपंचाय; दोन्ही गावांत पाण्याची समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 11:28 PM2020-12-30T23:28:06+5:302020-12-30T23:28:12+5:30
ग्रामपंचायत निवडणूक : दोन्ही गावांत पाण्याची समस्या
सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्यात ४३१ ग्रामपंचायती असून, त्यापैकी १५८ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आले. यामध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत कल्याण तालुक्यातील म्हारळगाव आहे. तेथे १७ सदस्यांची निवड होणार आहे. तर सर्वात लहान मुरबाड तालुक्यातील चिरड ही ग्रामपंचायत असून तिच्या निवडणूक रिंगणात सात सदस्य आहेत. निवडणूक होत असलेल्यांपैकी म्हारळगाव ही सर्वात मोठी ग्रामपंचायत जिल्ह्यात आहे. तिच्या सहा प्रभागांतील १७ सदस्यांना १६ हजार ८५२ मतदार निवडून देणार आहेत. यापैकी सात हजार ५३० महिला मतदार आहेत.
कल्याण तालुक्यातील ही ग्रामपंचायत उल्हासनगर शहरास लागून आहे. या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रहिवाशांना मुबलक पाणीपुरवठ्याची समस्या भेडसावत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत या गावाला सुरळीत व मुबलक पाण्याची गरज आहे. तर, दुसरीकडे जिल्ह्यात सर्वात लहान चिरड ग्रामपंचायत मुरबाड तालुक्यात आहे. तिच्या सात सदस्यांसाठी येथील ३०९ जण मतदान करणार आहेत. यात १३३ महिला मतदारांचे मतदान उमेदवारांच्या विजयासाठी निर्णायक ठरते. उन्हाळ्यात पाणीटंचाई, तर पावसाळ्यात रस्त्याच्या प्रमुख समस्या ग्रामस्थांना भेडसावते. तीन प्रभागांत यंदाची निवडणूक होणार आहे. प्रसंगी यंदा बिनविरोध निवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.