विकासाअभावी मुरबाड तालुक्याचे वर्षाला २१३ कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 04:21 AM2019-03-18T04:21:55+5:302019-03-18T04:22:25+5:30

कल्याण-मुरबाड रेल्वे सुरू झाल्यास मागास तालुक्याचा विकास होईल. नोकरीसाठी येथील नागरिक दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत आहेत. शेती येथील प्रमुख व्यवसाय असल्याने येथे पिकवलेले उत्पादन शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठेतच विकावे लागते.

 Mhrabad taluka damages 213 crore rupees annually due to lack of development | विकासाअभावी मुरबाड तालुक्याचे वर्षाला २१३ कोटींचे नुकसान

विकासाअभावी मुरबाड तालुक्याचे वर्षाला २१३ कोटींचे नुकसान

Next

कल्याण-मुरबाड रेल्वे सुरू झाल्यास मागास तालुक्याचा विकास होईल. नोकरीसाठी येथील नागरिक दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत आहेत. शेती येथील प्रमुख व्यवसाय असल्याने येथे पिकवलेले उत्पादन शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठेतच विकावे लागते. जर रेल्वेची सोय झाली तर शेतीमाल अन्य बाजारपेठेत घेऊन जाता येईल. शेतकऱ्यांच्या गाठीशी चार पैसे जमा होतील.

मुरबाड रेल्वेमार्ग हा केवळ कल्याण-मुरबाडपर्यंत करण्याची मागणी केल्यास त्याला रेल्वे प्रशासन गांभीर्याने घेणार नाही. मात्र तोच प्रस्ताव कल्याण-नगर रेल्वे म्हणून पाठपुरावा केल्यास त्या मार्गाला गती मिळेल असा विश्वास मुरबाड-कल्याण रेल्वे संघर्ष समितीचे चेतनसिंह पवार यांनी व्यक्त केला आहे. मुरबाडमध्ये रेल्वे यावी यासाठी संघर्ष समितीमार्फत मुरबाड तालुक्यात १८२ गावे आणि पाड्यांमध्ये जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली होती. मुरबाड हे रेल्वेने जोडले न गेल्याने मुरबाड तालुक्याचे प्रचंड नुकसान होत आहे. शैक्षणिक, व्यवसायिक, रोजगार, शेती, आणि वैद्यकीय विभागाशी निगडीत अनेक समस्या भेडसावत आहेत. मुरबाडला रेल्वे नसल्याने सरासरी २१३ कोटींचे नुकसान मुरबाड तालुक्याला सहन करावे लागत आहे. त्यामुळे मुरबाडच्या विकासासाठी रेल्वे ही गरजेची असल्याचे मत संघर्ष समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे.
मुरबाडपर्यंत रेल्वे कुठून येणार त्यापेक्षा ती रेल्वे कधी येणार याची उत्सुकता मुरबाडकरांना लागली आहे. रेल्वेचे मुरबाडकरांचे स्वप्न हे अनेकवेळा भंग पावले आहे. शांताराम घोलप यांच्यासारखे नेते या तालुक्याला लाभलेले असतानाही त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. मात्र एक गोष्ट खरी होती की त्यांनी मुरबाड रेल्वेचे खोटी आश्वासने देऊन निवडणुका लढविलेल्या नाहीत. आहे त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची मुरबाडकरांची सवय चार वर्षात बदलली आहे. राजकीय नेते सांगतील हे खरे मानून त्यांचा जयजयकार काही वर्षात वाढला आहे. मात्र मुरबाड रेल्वेचे स्वप्न हे अजूनही स्वप्नच राहिले आहे. मात्र हे स्वप्न पूर्ण होणार कधी हा प्रश्न विचारणारे मुरबाडकर अजूनही पुढे सरसावत नाहीत. मात्र तेच मुरबाडकर रेल्वेसाठी घेण्यात येणाºया जनसंघर्ष यात्रेत सहभागी होतात. मुरबाड-कल्याण रेल्वे संघर्ष समितीच्या बैठकीला मिळणारा प्रतिसाद पाहता तालुक्याला रेल्वेची नितांत गरज आहे. मात्र या संघर्ष सभेत जो सूर निघतो तो पाहता केवळ कल्याण-मुरबाड अशी मागणी केल्यास ती मागणी लवकर पूर्ण होणार नाही अशीच स्थिती आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या मानसिकतेचा विचार करता लांबपल्ल्यांच्या गाड्यांच्या मार्गांचा विचार करूनच सुविधांची मागणी करण्याची गरज व्यक्त होत आहे. त्यामुळे कल्याण- नगर हीच रेल्वे व्हावी अशी मागणी पुढे येत आहे.
मुरबाड रेल्वे ही कल्याण, अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्यातील अती दुर्गम भागातून काढण्याचा प्रस्ताव दिसत आहे. कांबा, आपटी, पोटगाव आणि मुरबाड हा मार्ग पाहता हा सर्व परिसर शहरापासून आतील भागात आहे. तसेच डोंगर आणि नदी ओलांडून रेल्वेला मुरबाड गाठावे लागणार आहे. मात्र या मार्गासाठी तयार केलेला प्राथमिक आराखडा, रेल्वेचे अंतर, नदीवरील पूल आणि डोंगरांमधील बोगदे यांचा विचार करता रेल्वेने खरोखरच प्रस्तावाची तयारी केली आहे की केवळ दिखावा तयार केला आहे हे अजूनही स्पष्ट होत नाही. आर्थिक तरतुदीचा विचार करता जे आकडे पुढे येत आहेत ते कोट्यवधींच्या घरात आहे. त्यामुळे या आर्थिक तरतुदीला आधार कोणता आहे का हे अधिकृतपणे रेल्वेकडून स्पष्ट केलेले नाही. मुरबाड-कल्याण रेल्वेची माहिती देणारे जो कागद सर्वत्र दाखविण्यात येत आहेत, त्या कागदाला कोणताच आधार नाही किंवा रेल्वेची मान्यता असलेली आकडेवारी नाही. मोघम माहिती देणारे कागद दाखविण्यात येत आहे. मात्र रेल्वे विभागाचे कोणतेच कागदपत्र पुढे केले जात नाहीत. त्यामुळे वरवर रेल्वेची ओरड सुरु असली तरी त्याची वास्तविकता तपासण्याची वेळ मुरबाडकरांवर आली आहे.

रोजगारासाठी परतालुक्यात अनेक कुटुंबे स्थायिक

मुरबाड तालुक्याचा विकास हा झपाट्याने होत आहे. मुरबाड तालुक्याचा विस्तार पाहता हा भाग शेतीप्रधान आहे. शेतीवर उपजिवीका करणारे अनेक कुटुंब असले तरी आज रोजगाराच्या शोधात अनेक कुटुंब हे तालुक्याच्या बाहेर गेले आहेत. गेल्या २० वर्षात तब्बल १५ हजाराहून अधिक कुटुंब हे रोजगारासाठी दुसºया तालुक्यात स्थायिक झाले आहे.
तालुक्यातील अनेक गाव आणि पाड्यांमधील शिरगणना ही अल्प झाली आहे. गाव आहेत पण त्या ठिकाणी कुटुंब आणि कुटुंबातील सदस्य हे रोजगारासाठी तालुक्याच्या बाहेर गेले आहेत. मुरबाडमध्ये राहून रोजगारासाठी दुसºया तालुक्यात जाणे हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. मुरबाडमध्ये रेल्वे नसल्याने वाहतुकीचे साधन म्हणजे एसटी आणि खाजगी जीप सेवा. मुरबाडहून कल्याण गाठण्यासाठी ४० रुपये
खर्च येतो.
कल्याणच्या पुढे रेल्वेने मुंबई गाठण्यासाठी पुन्हा २० ते ४० रुपये खर्च येतो. त्यामुळे कल्याणच्या पुढे कामानिमित्त जाणाºया चाकरमान्यांचा अर्धा पगार हा प्रवासावर खर्च करावा लागतो. त्यामुळे मुरबाडहून रोज ये-जा करून नोकरी करणारे नोकरदारच शिल्लक राहिलेले नाही. प्रवासाचा खर्च जास्त असल्याने अनेक कुटुंब दुसºया तालुक्यात स्थायिक होत आहेत.

मुरबाड तालुक्याची शैक्षणिक अधोगती

ज्या- ज्या तालुक्यात रेल्वे सेवा आहे त्या- त्या तालुक्यात शैक्षणिक विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. अंबरनाथ, कल्याण, शहापूर आणि कर्जत या तालुक्यांना रेल्वेने जोडले गेल्याने त्या ठिकाणी शैक्षणिक क्रांती झाली आहे. या तालुक्यांमध्ये इंजिनिअरिंग, डिप्लोमा आणि इतर व्यावसायिक महाविद्यालय मोठ्या संख्येने आहेत.

त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील विद्यार्थीही त्या ठिकाणी शिक्षणासाठी येतात. मात्र मुरबाड तालुक्यात एकही डिप्लोमा कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झालेले नाही. मूळात विद्यार्थी मुरबाडमध्ये येण्यासाठी साधने अपुरे असल्याने कोणत्याच शैक्षणिक संस्था पुढे सरसावत नाहीत. मुरबाड रेल्वेने जोडली गेली असती तर अनेक शैक्षणिक संस्था या ठिकाणी आल्या असता.

बाहेरील नव्हे तर किमान मुरबाड तालुक्यातील विद्यार्थ्यांना तरी या शैक्षणिक संस्थांचा लाभ मिळाला असता. मात्र मुरबाड तालुक्यातील विद्यार्थी आहे त्या परिस्थितीत मिळेल त्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. मात्र नोकºया मुरबाडमध्ये उपलब्ध होत नाहीत. येथील एमआयडीसीही कच खात आहे. त्यामुळे नोकरीची संधीही कमी होत आहे. रेल्वेसेवा निर्माण झाल्यास मुरबाडमध्ये औद्योगिक आणि शैक्षणिक विकास साधणे शक्य होईल.

रेल्वेची गरज शेती
आणि दुग्धव्यवसायाला

मुरबाड तालुक्यात ९० टक्के शेतकरी हे शेती आणि दुग्धव्यवसाय करतात. मात्र त्यांच्या शेतमालाला बाजारपेठेपर्यंत पोहचविणे हे खर्चिक ठरत आहे. मुरबाडमधील भाजी किंवा दुग्धजन्य पदार्थ हे कल्याण किंवा इतर बाजारपेठेत पोहचविण्यासाठी खाजगी गाडीचा वापर करावा लागतो.
वाहतुकीचा खर्च जास्त असल्याने शेतकरी मिळेल त्या भावात भाजीपाला मुरबाडमध्ये विविध दलालांमार्फत विकला जातो. त्यामुळे त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. रेल्वेची सुविधा असती तर शेतमाल रेल्वेने बाजारपेठेपर्यंत पोहचविणे शक्य झाले असते. त्यामुळे शेतकºयांचे होणारे नुकसान थांबविता आले असते.
हीच परिस्थिती दुग्ध व्यवसायाची झाली आहे. दुधाला स्थानिक बाजारपेठेत योग्य भाव मिळत नाही. हे दूध कल्याण किंवा मुंबई परिसरात पोहचविण्यासाठी रेल्वे असती तर कमी खर्चात अधिकाधिक माल दुसºया तालुक्यात विकता आला असता. त्यामुळे शेतकºयांना योग्य तो लाभ मिळाला असता.

मुरबाड-कल्याण रेल्वेपक्षा कल्याण - नगर रेल्वेचा विचार झाल्यास मुरबाडपर्यंत लवकरात लवकर रेल्वे येईल. रेल्वे प्रशासन नफ्याचा विचार करूनच रेल्वेसेवा देते. त्यामुळे नगरपर्यंत रेल्वे गेली तर औरंगाबादला जोडणे शक्य होईल. त्यामुळे आतापासूनच कल्याण-नगर रेल्वेच्या अनुषंगानेच विचार झाला पाहिजे.
- चेतनसिंह पवार, मुरबाड-कल्याण रेल्वे
संंघर्ष समिती समन्वयक.

रेल्वे मार्गाचे विविध पैलू

रेल्वे प्रशासनाने उल्हासनगरमार्गे रेल्वे वळविण्याचा विचार केला आहे. मात्र ही बाब कागदावर वाटते तेवढी सोपी असली तरी प्रत्यक्षात जागेवर रेल्वे मार्ग टाकणे ही अवघड बाब आहे. उल्हासनगरच्या हद्दीतून रेल्वे नेण्यासाठी मोकळी जागाही शिल्लकच नाही. उल्हासनगर आणि विठ्ठलवाडीमधून रेल्वे नेण्याचा प्रयत्न केला तरी ती पुढे शहाडला निघणार आहे. त्यामुळे तेथून पुढे रेल्वेमार्ग टाकणे ही अवघड बाब आहे.

विठ्ठलवाडी आणि उल्हासनगरमधून वाहणाºया वालधुनी नाल्याला समांतर रेल्वेमार्ग टाकण्याचा प्रयत्न केला तरी तो मार्ग शहाडजवळच येतो. त्यामुळे तेथेही अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
उल्हासनगर रेल्वे स्थानकानंतर वडोल गावातून रेल्वे वळविण्याचा प्रस्ताव आल्यास वडोल गाव, साईबाबा मंदिर परिसर या गजबजलेल्या वस्तीतून रेल्वे मार्ग टाकणे हे रेल्वेला आव्हानात्मक ठरणार आहे. ही वस्तू ४० ते ५० वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्यास आहे. त्यामुळे तो मार्गही अवघडच मानला जात आहे. 

Web Title:  Mhrabad taluka damages 213 crore rupees annually due to lack of development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.