म्हसा यात्रेला नोटाबंदीचा फटका
By admin | Published: January 13, 2017 07:01 AM2017-01-13T07:01:01+5:302017-01-13T07:01:01+5:30
पारंपरिक उत्साहात, विधिवत परंपरेत गुरुवारपासून ऐतिहासिक म्हसा यात्रा सुरू झाली.
मुरबाड : पारंपरिक उत्साहात, विधिवत परंपरेत गुरुवारपासून ऐतिहासिक म्हसा यात्रा सुरू झाली. यात्रेला भरपूर गर्दी होते आहे, पण नोटाबंदीमुळे हाती पुरेशी रोकड नसल्याचा फटका यात्रेला बसतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. प्रसिद्ध बैलबाजार खरेदीदारांच्या प्रतीक्षेत आहे आणि सुटे पैसे नसल्याने मनोरंजनाचे खेळही प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत आहेत.
घोंगड्यांचा बाजार, मिठाईविक्रेते यांनाही अद्याप पुरेशा खरेदीने दिलासा मिळालेला नाही. संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरात, बिहार, तामीळनाडू, कर्नाटक या राज्यांत प्रसिद्ध असणारी म्हसा यात्रा गुरुवारपासून सुरू झाली. यात्रेत तमाशा, आकाशपाळणे तसेच विविध प्रकारच्या मनोरंजन कार्यक्र मांची रेलचेल आहे. प्रमुख आकर्षण असते, ते बैलबाजाराचे. शर्यतीसाठी लागणारी चपळ जनावरे या यात्रेत मिळत असल्याने नगर, जुन्नर, मंचर, सोलापूर, कोल्हापूरसह ठाणे, रायगड, नाशिक जिल्ह्यांतील शेतकरी यात्रेत हजेरी लावतात. शिवाय घोंगडी, मिठाई, भांडीबाजार भरतो. १५ दिवस चालणाऱ्या यात्रेत किमान ५० लाखांच्या आसपास नागरिक येतात.
नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. संसारोपयोगी वस्तूंची व शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांची ही खरेदीही येथे मोठ्या प्रमाणात होते. यात्रेच्या पहिल्या दिवशी गर्दीचे प्रमाण फारच कमी असल्याने त्याचा फटका व्यापारी व व्यावसायिकांना बसला.
ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलीस निरीक्षक, २३ अधिकारी, २१० पोलीस कर्मचारी व ५० महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. बेकायदा व्यवसाय किंवा अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून मुरबाडचे पोलीस उपविभागीय अधिकारी एच.टी. व्हटकर व पोलीस निरीक्षक अजय वसावे यांनी तीन पथके तयार केली आहेत. (वार्ताहर)
एसटीच्या खास बस : एसटी महामंडळाने वाहतूक निरीक्षक डी.के. भडकमकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड ६, ठाणे ६, भिवंडी ६, वाडा ६, शहापूर ३, कल्याण ६ या आगारांच्या बस यात्रेसाठी उपलब्ध केल्या असून पहिल्याच दिवशी ७० फेऱ्या झाल्या. दिवसभरात २०० फेऱ्या करण्याचा संकल्प असून सुमारे दीड लाख उत्पन्न मिळेल, असे त्यांनी सांगितले.