मायक्रो फायनान्सचा गंडा
By admin | Published: October 6, 2016 03:18 AM2016-10-06T03:18:03+5:302016-10-06T03:18:03+5:30
आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची लाखो रूपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार मायक्रो फायनान्स लिमिटेडच्या भिवंडी शाखेमध्ये उघडकीस आला आहे
राजू ओढे , ठाणे
आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची लाखो रूपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार मायक्रो फायनान्स लिमिटेडच्या भिवंडी शाखेमध्ये उघडकीस आला आहे. ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपी ओडिशाचे रहिवासी असल्याने त्यांच्या अटकेसाठी व्यूहरचनाही आखली आहे.
मायक्रो फायनान्स लिमिटेडचे मुख्य कार्यालय भुवनेश्वर येथे आहे. भिवंडीतील गोवेनाका परिसरात २0१२ मध्ये या संस्थेची शाखा सुरु झाली. १0 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून या संस्थेने गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या.
गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी स्थानिक युवकांना एजंट म्हणून नेमले. एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेसारखी पासबूक, विविध योजनांची छापील पत्रके, तसेच संस्था सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व परवाने असल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास आत्मसात करण्यास या ठगांना वेळ लागला नाही. पाहता-पाहता संस्थेच्या योजनांमध्ये जवळपास ३00 ते ४00 गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली. सुरूवातीच्या दोन वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना संस्थेने ठरलेल्या व्याजदराप्रमाणे परतावा दिला.११५0 गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली. अपेक्षित रक्कम गोळा झाल्यानंतर आॅक्टोबर २0१४ मध्ये संस्था चालकांनी गाशा गुंडाळला. गुंतवणूकदारांनी योजनांची मुदत संपेपर्यंत प्रतीक्षा केली; मात्र मुदत संपल्यानंतरही संस्थेचा ठावठिकाणा दिसत नसल्याचे पाहून गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धावघेतली. ठाणे आथिंक गुन्हे शाखेने रामनारायण राऊत, सेसादेव हरीहर पांडा आणि वसंत वृंदावन दाश या तिघांवर गुन्हा दाखल केला.