एमआयडीसीची जलवाहिनी पुन्हा फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:44 AM2021-09-26T04:44:26+5:302021-09-26T04:44:26+5:30
मीरा रोड : एमआयडीसीची जलवाहिनी गुरुवारी रात्री फुटल्याने तिचे दुरुस्ती काम पूर्ण होऊन शनिवारी सकाळी पाणीपुरवठा सुरू झाला असतानाच ...
मीरा रोड : एमआयडीसीची जलवाहिनी गुरुवारी रात्री फुटल्याने तिचे दुरुस्ती काम पूर्ण होऊन शनिवारी सकाळी पाणीपुरवठा सुरू झाला असतानाच शनिवारी सायंकाळी शिळफाटा येथे पुन्हा जलवाहिनी फुटल्याने मीरा-भाईंदरचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्राधिकरणाची लोढा हेवन, हॉटेल विजयलक्ष्मीजवळ १८०० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी २३ सप्टेंबरला गुरुवारी रात्री ८.५० च्या सुमारास फुटल्यामुळे शहरास एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा खंडित झाला. शनिवारी २५ सप्टेंबरला सकाळी ६.३० वाजता शहराचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू झालेला असताना सायंकाळी ५.४५ वाजता शीळ फाटा येथे पूजा पंजाब हॉटेलजवळ पुन्हा मुख्य जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा पुन्हा खंडित झालेला आहे. त्यामुळे स्टेमकडून पाणीपुरवठा सुरू असला तरी शहरास पाणीपुरवठा कमी दाबाने व उशिराने होणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांनी केले आहे.