एमआयडीसीनेच चोरले पाणी?

By admin | Published: March 4, 2016 01:45 AM2016-03-04T01:45:00+5:302016-03-04T01:45:00+5:30

एमआयडीसीने आतापर्यंत मंजूर कोट्यापेक्षा ७० एमएलडी पाणी अधिक उचलल्याने पाण्याची स्थिती गंभीर बनली आहे. अजूनही एमआयडीसीने जादा उपसा थांबवला

MIDC has stolen water? | एमआयडीसीनेच चोरले पाणी?

एमआयडीसीनेच चोरले पाणी?

Next

सुरेश लोखंडे,  ठाणे
एमआयडीसीने आतापर्यंत मंजूर कोट्यापेक्षा ७० एमएलडी पाणी अधिक उचलल्याने पाण्याची स्थिती गंभीर बनली आहे. अजूनही एमआयडीसीने जादा उपसा थांबवला तर फारसे कोणाचे पाणी न तोडता ठाणे जिल्ह्याला १५ जुलैपर्यंत पाणी पुरवता येऊ शकते. या स्थितीत पिण्यासाठी उद्योगांचे पाणीही तोडण्याची वेळ येणार नाही, अशी माहिती पाटबंधारे विभागासह अन्य विभागांनी दिलेल्या तपशिलातून उघड झाली आहे.
सध्या सुरू असलेली ४० टक्के कपात फार तर वाढेल, पण मे मध्येच पाणीसाठा संपण्यासारखी गंभीर स्थिती निर्माण होणार नाही, हेही या माहितीतून समोर आले. त्यामुळेच कोटा पाळणे, उपशावर नियंत्रण यासाठी मंत्र्यांसोबत होणाऱ्या पुढील बैठकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
एमआयडीसीद्वारे उल्हासनगर, मीरा-भार्इंदर, कल्याण-डोंबिवली, ठाणे महापालिका आदींना पाणीपुरवठा होतो. पण, लघुपाटबंधारे आणि एमआयडीसी यांच्यातील मंजूर कोट्याच्या आकडेवारीत मोठी तफावत असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या बैठकीत उघड झाले. पण, आकडेवारी, उचल याबाबत त्यांच्यात एकमत झाले नाही. त्यासाठी पुन्हा बैठक घेऊन पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व यंत्रणांना समान पाणीपुरवठ्याच्या सूचना द्याव्या लागतील. कोट्याचे वेळापत्रक पाळावे लागेल. त्यामुळे लवकरच होणारी पुढील बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
उपलब्ध पाणीसाठ्यातून शहाड-टेमघरने २८५ ऐवजी सुमारे २९० एमएलडी पाणी उचलले आहे, तर जीवन प्राधिकरणानेही ८५ एमएलडीऐवजी ९० ते १०० एमएलडी जादा पाणी उचलले आहे. सप्टेंबरपासून कपात असतानाही जादा पाणी उचलण्याचा सपाटा लावल्याने पाणीसाठा झपाट्याने घटला. परिणामी, पाणी उचलण्यावर निर्बंध आणत कपात ४० टक्क्यांवर गेली. तरीही, आमच्या रेकॉर्डनुसार एमआयडीसी जादा पाणी उचलत आहे. त्यांनी आठवड्यात केवळ दोन हजार ९१५ एमएलडी पाणी उचलून पुरवठा करण्याची गरज आहे, असे लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष वाघमारे यांनी सांगितले. त्यातून अन्य शहरांवर अन्याय होत असल्याचे त्यांनी सांगितले. रोजचे ५८३ एमएलडी एवढे मंजूर कोट्याचे पाणी उचलावे, असे एमआयडीसीला सांगण्यात आले. परंतु, आमचा मंजूर कोटा ५८३ एमएलडी नसून ७७० एमएलडी असल्याचा दावा एमआयडीसीने केला. त्यावर, एमआयडीसीचा मंजूर कोटा ७०० एमएलडी आहे. त्यातून कल्याण- डोंबिवलीला ११७ एमएलडी मंजूर केले आहे. ते वजा करता ५८३ एमएलडी पाणी एमआयडीसी उचलू शकते. मात्र, एमआयडीसी जादा ७० एमएलडी उचलत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मंजूर कोट्याचा वाद शिगेला पोहोचला आहे. एमआयडीसी जादा पाणी उचलून आदेशाची पायमल्ली करीत असल्याचे मत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष वाघमारे यांनी मांडले.
> वाढीव पाणीयोजनेचा अंबरनाथमध्ये बोजवारा
अंबरनाथ : अंबरनाथ शहरासाठी मंजूर झालेल्या ७७ कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम अर्थवट अवस्थेत आहे. त्यामुळे पाणी वितरणात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. कपातीचे दिवस वगळता इतर दिवशीही पाणी मिळत नसल्याने गुरुवारी कमलाकरनगर परिसरातील महिलांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला.
कपातीमुळे आठवड्यातून केवळ तीन दिवस पाणी दिले जाते आहे. मात्र, या तीन दिवसांतही पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहे. कमलाकरनगर, भोपीवाडी, डीएमसी चाळ परिसर आणि कोहजगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बुधवारी रात्री मुख्य जलकुंभाची पाण्याची पातळी सर्वाधिक असतानाही या भागाला पाणीपुरवठा झाला नाही. वितरण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याने हा घोळ होतो आहे. पाणी असतानाही ते का मिळत नाही, याचा शोध घेण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. तेव्हा परिसरातील मोठ्या गृहसंकुलांना पाणी वळवण्यात आल्याचे समजले.
प्राधिकरणाच्या कामाच्या पद्धतीवर संतप्त झालेल्या महिलांनी नगरसेवक प्रदीप पाटील, उमेश पाटील आणि मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांना त्यांच्याच कार्यालयात घेराव घातला. महिलांचा आक्रोश आणि नगरसेवकांचा संताप पाहून अधिकाऱ्यांनी या परिसरातील नियोजनासाठी अन्य अधिकाऱ्यांना जागेवर हजर राहण्याचे आदेश दिले.
अधिकाऱ्यांना घेराव घातल्यावर पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी उघड झाल्या. पाणीयोजनेचे काम जो ठेकेदार करीत आहे, त्या ठेकेदाराचे काम संथगतीने सुरू असल्याची कबुली जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. काही ठिकाणी हे काम रखडल्याचेही त्यांनी कबूल केले.
> ‘‘सर्वसामान्यांच्या वाट्याला येणारे पाणी विशिष्ट गृहसंकुलांना बेकायदा पुरविले जाते. अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने या संकुलांना जलजोडणी दिल्याने नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागले.
- प्रदीप पाटील, काँग्रेस गटनेते

Web Title: MIDC has stolen water?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.