एमआयडीसीला हवी स्वतंत्र पाण्याची सोय
By admin | Published: March 8, 2017 04:17 AM2017-03-08T04:17:42+5:302017-03-08T04:17:42+5:30
उद्योग आणि औद्योगिक परिसरातील निवासी वसाहतींसाठी ठामपा एमआयडीसीकडूनच पाणी उचलते आणि ते वितरित करते. उद्योगांना हे पाणी अत्यंत अपुरे पडते.
ठाणे : उद्योग आणि औद्योगिक परिसरातील निवासी वसाहतींसाठी ठामपा एमआयडीसीकडूनच पाणी उचलते आणि ते वितरित करते. उद्योगांना हे पाणी अत्यंत अपुरे पडते. त्याऐवजी पालिकेने शहाड स्टेम प्राधिकरणाकडून पाणी घेऊन ते या वसाहतीला पुरवण्यासाठी तरतूद करावी, असे मत ठाणे लघुउद्योजक संघटनेचे कोषाध्यक्ष भावेश मारु आणि उपाध्यक्ष आशिष शिरसाठ यांनी मांडले. पाण्याबरोबरच या भागात सुविधा पुरवण्याकडे लक्ष द्यावे, असेही त्यांनी सुचविले.
अर्थसंकल्पासाठी नागरिकांच्या सूचना मागवण्याच्या कल्पनेचे ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन (टिसा) तर्फे शिरसाठ आणि मारु यांनी स्वागत केल. मारु म्हणाले, औद्योगिक वसाहतीत मुख्य समस्या पाण्याची आहे. वागळे इस्टेट, पोखरण रोड या औद्योगिक वसाहतीला पुरवठा सुरळीत झाला पाहिजे. वास्तविक, ठाणे एमआयडीसीला अवघ्या दहा टीएमसी पाण्याची गरज आहे. गुरुवारी पाणीपुरवठा खंडीत झाल्यानंतर तो शनिवारपर्यंत सुरळीत होतो. वारंवार पाणीपुरवठा खंडीत झाल्याने निवासी वसाहतीबरोबर औद्योगिक विभागाचीही मोठया प्रमाणात गैरसोय होते. त्यासाठी शहाड टेमघर पाणीपुरवठा योजनेतून ठामपाने वागळे इस्टेट औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करावा. त्याबदल्यात एमआयडीसी पालिकेच्या कार्यक्षेत्रातील कळव्यासारख्या दुसऱ्या- तुलनेने जवळच्या विभागाला पाणीपुरवठा करु शकते. ठामपा एमआयडीसीच्या बारवी धरणातूनच पाणी घेऊन ते औद्योगिक भागाला पुरवते. वागळे इस्टेटसारख्या शेवटच्या टोकाला पाणी मिळेपर्यंत ते अपुरे पडते. त्यामुळेच ठामपाने शहाडमधून पाणी उचलून ते वागळे इस्टेटच्या औद्योगिक आणि निवासी वसाहतीला पुरविण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करावी, असा आग्रह मारु यांनी धरला.
ठाणे महापालिका प्रशासनाकडून एमआयडीसी तसेच शहरात वेगवेगळया भागात रस्ते बनविण्याचे काम चालते. ते किती काळ चालावे, याला मर्यादा हवी. ते लांबल्याने त्याचा खर्चही वाढतो. त्यामुळे ते ठराविक मुदतीतच पूर्ण करण्याचे बंधन संबंधित यंत्रणेवर असावे. तरच नागरिकांच्या करातील पैसा योग्यप्रकारे खर्च होईल, अशी सूचना त्यांनी केली.
वाहनतळ हवा
ठाणे आणि वागळे इस्टेट ही एकेकाळची सर्वात मोठी ऐतिहासिक औद्योगिक वसाहत आहे. त्यातील अनेक उद्योग परराज्यात आणि इतर ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. वाहतूक आणि पार्किंग सुविधा पुरवण्यासाठी अजूनही या भागाचा पालिकेने विचार केलेला नाही. औद्योगिक वसाहतीमध्ये एखादी तरी पार्र्किंगची यंत्रणा किंवा वाहनतळ उभारण्याची तरतूद पालिकेने करणे गरजेचे आहे.
कचरा कराची दुहेरी आकारणी का?
महापालिकेकडून कर वसूल होणे मान्य आहे. परंतू, त्यामध्ये सुसूत्रता हवी. मालमत्ता करातूनच कचरा उचलण्याचा कर आकारला जातो. तरीही औद्योगिक आणि व्यापारी यांच्याकडून पुन्हा वेगळया नावाने कराची आकारणी कशासाठी केली जाते, असाही सवाल त्यांनी केला.
स्वच्छतागृहे, सीसीटीव्ही हवेत
स्वच्छ भारत अभियान ही योजनाही परिणामकारकपणे राबविली पाहिजे. जागोजागी कचराकुंडी आणि स्वच्छतागृहे उभारली गेली पाहिजेत. बऱ्याचदा, औद्योगिक वसाहतीमध्ये सीसीटीव्ही लावण्यासाठी निधी अपुरा असल्याचे सांगितले जाते. परंतू, या भागातील चौऱ्या आणि इतर गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही आणि अंतर्गत पथदिवेही लावण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद व्हावी, अशी अपेक्षा मारु यांनी व्यक्त केली.
पायाभूत सुविधा हव्या
‘टिसा’चे उपाध्यक्ष आशिष शिरसाठ म्हणाले, वागळे इस्टेट एमआयडीसीच्या परिसरातील रस्ते, गटारे या मुलभूत सुविधांची जबाबदारी ही ठाणे महापालिकेची आहे. तरीही त्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. यात पालिका प्रशासनाने लक्ष देऊन कोणते अंतर्गत रस्ते खराब झाले आहेत, कुठे दुरुस्तीची गरज आहे, याची वेळोवेळी पाहणी करुन ती कामे केली पाहिजेत.
नियमित सफाईच नाही
लघुउद्योजकांकडून कचरा उचलण्यासाठी वेगळा कर लावला आहे, तरीही नियमित साफसफाई केली जात नाही. २० फूटांच्या रस्त्यावरील अतिक्रमणाची तक्रार केली तर त्याकडेही डोळेझाक केली जाते.
परिवहन सेवा सुधारा
एमआयडीसी परिसरात कामगारांना ने- आण करणाऱ्या सार्वजनिक उपक्रमातील बसेसचे जाळे हे चांगल्या प्रकारे असणे आवश्यक आहे. वागळे इस्टेट रोड क्रमांक १६ आणि आजूबाजूच्या परिसरात प्रवासी संख्या मोठी आहे. पण त्याप्रमाणात बसच नाही. अपुऱ्या बसेसमुळे कामगारांना एकाच बससाठी अर्धा ते पाऊण तास बससाठी तिष्ठत रहावे लागते. त्यामुळे जादा बस फेऱ्या वाढविण्यासाठी टीएमटीने बस खरेदी कराव्यात, तशी ठामपाने विशेष तरतूद करावी, असेही शिरसाठ म्हणाले.
अतिक्रमणे रोखा
औद्योगिक वसाहतीमधून बाहेर जाणाऱ्या आणि येणाऱ्या रस्त्यांवर अतिक्रमणे होणार नाहीत, याची दक्षता घेतली पाहिजे. त्यामुळे वाहतूक विनाअडथळा सुरु राहील. या वसाहतींमध्ये साप्ताहिक आठवडेबाजारालाही पालिकेने परवानगी नाकारणे अपेक्षित आहे. अंतर्गत पथदिव्यांची सुविधा झाल्यास रस्त्यावर अंधारातच होणारे ‘गैरप्रकार’ रोखता येतील, असेही शिरसाठ म्हणाले. (प्रतिनिधी)
स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवा
वारंवार फक्त रस्ता रुंदीकरण करण्यापेक्षा प्रभागातील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडेही लक्ष दिले पाहिजे. एकीकडे स्वच्छता अभियानाच्या गप्पा होतात. दुसरीकडे पुरेशी आणि स्वच्छ स्वच्छतागृहेही नाहीत. केवळ निवडणुकीच्या काळात नेत्यांकडून आश्वासने दिली जातात. नंतर कोणी लक्षही देत नाही. भीमनगर, सुभाषनगर या प्रभाग सातमधील स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय दयनीय आहे. काही ठिकाणी तीही नाहीत. महापालिकेने या समस्येकडे लक्ष द्यावे, यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावाही करणार आहे.
- तेजल सोपारकर, प्रभाग क्र. ७
पाणीपुरवठा सुरक्षित व्हावा
शिवाईनगर भागात सिमेंटचे रस्ते आहेत. पण पाण्याची सुविधा नाही. अपुऱ्या आणि अनियमित पाणी पुरवठयाने येथील रहिवाशी हैराण आहेत. या भागात अनधिकृत एका एका इमारतीला पाच ते सहा जोडण्या आहेत. पाण्याचे योग्य नियोजन करुन पुरेसा पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे. यासाठी पालिकेने तरतूद करावी. उपवन परिसरात खेळाचे मैदान आहे, पण तिथे खेळाऐवजी इतर कार्यक्रम मोठया प्रमाणात होतात. हे मैदान केवळ खेळासाठी आरक्षित असावे, हीच अपेक्षा आहे.
- जितेंद्र शिंदे, शिवाईनगर, प्रभाग क्र. ५
नाले बंदिस्त करा
शास्त्रीनगर येथील एनजी विहार गृहसंकुलांमध्ये आठ इमारतींमध्ये २४० सभासद असून १२०० रहिवासी आहेत. पण या भागात अवघे अर्धा तास पिण्याचे पाणी येते. त्यामुळे बोअरवेलचे पाणी वापरावे लागते. या भागासाठी पालिकेने पिण्याच्या पाण्याची सुविधा करावी. या भागातील नाले उघडे असल्यामुळे त्याची दुर्गंधी सहन करावी लागते. त्यातच काही नागरिक नाल्यात कचरा फेकतात. याला आळा घालण्यासाठी नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीप्रमाणे या भागातील नालेही बंदिस्त करावेत. याशिवाय, येथे कचराकुंड्याही ठेवाव्या.
- किरण जनबंधू, एनजी विहार,
शास्त्रीनगर, ठाणे. (प्रभाग क्र. ६)
पाणी आणि रस्ते सुधारावे
पाचपाखाडी भागात अनेक धोकादायक इमारती आहेत. त्यासाठी क्लस्टरसारखी योजना महापालिकेने राबविणे आवश्यक आहे. या भागातील मुख्य रस्ते चांगले आहेत. पण अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या भागात वाहनांच्या पार्र्किंगचीही सुविधा नाही. रस्ते दुरुस्ती आणि पार्र्किंगसाठी पालिकेने तरतूद करावी. पाणीही अनियमित आणि अपुरे आहे. शहराच्या मध्यवर्ती आणि पालिकेच्या मुख्य भवनापासून जवळच असलेल्या या भागातील नागरी सुविधांसाठी पालिकेने आर्थिक तरतूद करण्याची अपेक्षा आहे.
- के. आर. विश्वनाथ,
पाचपाखाडी, ठाणे.