एमआयडीसीत होणार डोंबिवलीतले पासपोर्ट सेवा केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 05:34 PM2018-04-03T17:34:58+5:302018-04-03T17:34:58+5:30
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे डोंबिवलीत मंजूर झालेले पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र एमआयडीसी निवासी विभागात सुरू करण्यास योग्य असल्याची माहिती समोर आली.
डोंबिवलीत- खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे डोंबिवलीत मंजूर झालेले पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र कल्याण पश्चिमेला हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. ठाणे विभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याच्या चुकीमुळे डोंबिवलीत पुरेशी जागा नसल्याचे कारण दाखवत मंजूर झालेले पासपोर्ट सेवा केंद्र कल्याण (पश्चिम) येथील टपाल कार्यालयात हलविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, खा. डॉ. शिंदे यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी डोंबिवलीतच हे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू व्हावे यासाठी एमआयडीसी निवासी विभागातील पोस्ट ऑफिसची जागा पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यास योग्य असल्याची माहिती समोर आली. ठाणे विभागीय कार्यालयाचे वरिष्ठ अधिक्षकांसोबत दूरध्वनीवरून चर्चा केली असता असे निदर्शनास आले की कल्याण येथील टपाल कार्यालयात पासपोस्ट सेवा केंद्र सुरू करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. खा.डॉ. शिंदे यांनी ठाणे विभागीय अधिक्षक यांच्याशी चर्चा केल्याप्रमाणे पासपोर्ट सेवा केंद्र एसआयडीसी निवासी विभागात असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव मुंबई विभागीय कार्यालयाला पाठवला आहे. तसेच खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मंगळवार,३ एप्रिल रोजी यासंदर्भात नवी दिल्ली येथे परराष्ट्र विभागाचे सचिव ज्ञानेश्वर मुळ्ये यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान खा. शिंदे यांनी याबाबतची वस्तूस्थिती मुळ्ये यांच्याकडे मांडली. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत मुळ्ये डोंबिवलीतच हे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. खा. डॉ. शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी डोंबिवलीसाठी पासपोर्ट सेवा केंद्र मंजूर केले होते. त्याबाबतचे पत्र देखील श्रीमती स्वराज यांनी खा. डॉ. शिंदे यांना गेल्या वर्षी, १७ जून २०१७ रोजी पाठवले होते. डोंबिवलीत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यासाठी पोस्ट ऑफिसची जागा निश्चित करण्यासंदर्भात टपाल विभाग, तसेच मुंबई विभागीय पासपोर्ट कार्यालयाशी खा. डॉ. शिंदे यांनी पाठपुरावा सुरू केला होता.