एमआयडीसीतील कचरा पालिका उचलणार

By admin | Published: January 6, 2017 06:07 AM2017-01-06T06:07:04+5:302017-01-06T06:07:04+5:30

अंबरनाथ एमआयडीसी भागातील कंपन्यांकडून लाखोंचा कर वसूल करणारे पालिका प्रशासन या भागातील कचरा उचलण्यास स्पष्ट नकार देत होते

The MIDC will pick up the garbage dump | एमआयडीसीतील कचरा पालिका उचलणार

एमआयडीसीतील कचरा पालिका उचलणार

Next

पंकज पाटील, अंबरनाथ
अंबरनाथ एमआयडीसी भागातील कंपन्यांकडून लाखोंचा कर वसूल करणारे पालिका प्रशासन या भागातील कचरा उचलण्यास स्पष्ट नकार देत होते. कर घेता तर किमान सुविधाही द्या, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे. त्यामुळे आता पालिका प्रशासन या भागातील कचरा उचलण्याची तयारी करत असून त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय महिनाभरात होणार आहे.
अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील कचरा उचलण्यासाठी पालिकेने सक्षम यंत्रणा उभारली आहे. मात्र, याच पालिका हद्दीतील एमआयडीसी क्षेत्रात निर्माण होणारा कचरा उचलण्यासाठी कोणतीच यंत्रणा नाही. या कारखानदारांना सर्व सुविधा देण्याची जबाबदारी एमआयडीसीची आहे. रस्ते, वीज, दिवाबत्ती आणि पाणी अशा सुविधा एमआयडीसी देते. मात्र, कचरा उचलण्याची कोणतीच यंत्रणा एमआयडीसीकडे नाही. त्यामुळे या भागात निर्माण होणारा कचरा रस्त्याच्याकडेला पडतो. हा कचरा उचलण्याची जबाबदारी एमआयडीसी स्वीकारत नसल्याने आता कारखानदारांनी हा कचरा उचलण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा सुरू केला आहे. पालिकेकडे कचरा उचलण्याची यंत्रणा आणि डम्पिंग ग्राउंड असल्याने पालिकेनेच या भागातील कचरा उचलावा, अशी मागणी ‘आमा’ या संघटनेने केली आहे. मात्र, अनेक वर्षे या भागात कचरा उचलण्याची कोणतीच जबाबदारी पालिका प्रशासनाने घेतली नव्हती. मात्र, या भागातील कारखानदारांकडून करवसुली केली जात असल्याने या कराच्या मोबदल्यात कारखानदारांना पालिका कोणतीच सुविधा पुरवत नाही.
कर घेतल्यावर रस्ते, दिवाबत्ती यांची सोय पालिकेने करणे अपेक्षित असते. मात्र, कारखानदारांना या सुविधा एमआयडीसीकडून दिल्या जात असल्याने पालिका प्रशासन ही सुविधा पुरवत नाही. मात्र, लाखो रुपये कराच्या स्वरूपात गोळा करणाऱ्या पालिकेने या भागातील किमान कचरा उचलण्याची आणि त्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी कारखानदार करत आहेत.
पालिकेने अद्याप या ठिकाणी कचरा उचलण्याची यंत्रणा सुरू केलेली नसली तरी आता या कारखानदारांच्या रास्त मागणीनुसार या ठिकाणी कचरा उचलण्याची यंत्रणा तयार करण्याचा विचार करीत आहे. कर घेत असल्याने येथील कचरा उचलण्यास कोणतीच हरकत नाही, असे ठाम मत आता पालिका प्रशासनाचे झाले आहे. स्थानिक नगरसेवक सचिन पाटील आणि सदाशिव पाटील यांनीदेखील कचरा उचलण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे. नगरसेवकांच्या या मागणीचा विचार प्रशासनाने सुरू केला आहे. त्या अनुषंगाने पालिका सभागृहाची मंजुरी घेऊन ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. मात्र, ऐन निर्णयाच्या वेळी आचारसंहिता लागल्याने हा विषय एकदोन महिने पुढे सरकला आहे.

Web Title: The MIDC will pick up the garbage dump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.