आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय झाले स्थलांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:49 PM2020-02-24T23:49:07+5:302020-02-24T23:49:10+5:30
इमारत धोकादायक; नव्या कार्यालयाच्या भाड्यापोटी भुर्दंड
शेणवा : शहापूर प्रकल्प विभागाच्या कार्यालयाची इमारत निकृष्ट बांधकामामुळे धोकादायक झाल्याचे स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये उघड झाल्याने हे कार्यालय शहरातील नव्या इमारतीत तत्काळ स्थलांतरित केले आहे. या कार्यालयाच्या भाड्यापोटी आदिवासी विकास विभागाच्या तिजोरीवर दीड लाखांचा भार पडणार आहे. यामुळे टीका होत आहे.
आदिवासी विकास विभागाच्या निधीतून लाखो रु पये खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभागाने २०१० मध्ये बांधलेल्या प्रकल्प कार्यालयाच्या इमारतीचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम अभियंता आणि कंत्राटदाराने निकृष्ट बांधकाम केल्याने या इमारतीची नऊ वर्षांतच पडझड झाली आहे. निकृष्ट बांधकामामुळे भिंतींना भेगा पडल्या असून इमारतीसाठी वापरण्यात आलेला स्टीलही गंजले आहे. भिंतीचे प्लास्टरही ठिकठिकाणी निखळले आहे. इमारतीच्या छपराच्या स्लॅबला गळती लागली. या धोकादायक स्थितीतही जीव मुठीत घेऊन कर्मचारी काम करत होते. या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट झाल्यानंतर इमारत धोकादायक असल्याचे उघड झाले. यानंतर तत्काळ आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी ठाणे आदिवासी विभागाच्या अप्पर आयुक्तांना लेखी पत्र देऊन शहापूर आदिवासी प्रकल्प विभागाची इमारत धोकादायक असल्याची माहिती कळवली होती. याबाबत आदिवासी प्रकल्प अधिकारी अरु णकुमार जाधव यांनी ठाणे अप्पर आयुक्तांकडे भाडेतत्त्वावर जागा घेऊन कार्यलय स्थलांतरित करावे लागेल, असे पत्र दिले होते. या मागणीनंतर हे कार्यालय शहापूर शहारातील एका नव्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. या इमारतीतील जागेचे भाडे बांधकाम विभागाने ठरवलेल्या शासकीय भाडे दरानुसार एक लाख ४० हजार रु पये आहे. यासाठी पाच वर्षांचा भाडेतत्त्वाचा करार करण्यात आला आहे. आदिवासी प्रकल्प इमारतीच्या निकृष्ट कामाचा नाहक फटका आदिवासी विकास विभागाला सोसावा लागणार आहे.
कार्यालयाची इमारत धोकादाय असल्याने भाड्याने जागा घेण्यात आली आहे. भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या कार्यालयाचे भाडे हे शासकीय दरानुसार दरमहा एक लाख ४० हजार रु पये आकारण्यात आले आहे .
- व्ही .आर .गायकवाड,
सहाय्यक प्रकल्प अधिकारी (प्रशासक), एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर