स्थलांतरामध्ये सत्तासंघर्ष, शिवसेना-भाजपचा सामना सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 04:41 AM2018-08-27T04:41:29+5:302018-08-27T04:42:00+5:30
शिधावाटप कार्यालय:राज्यमंत्र्यांवर कार्यक्रम रद्द करण्याची ओढावली नामुश्की
डोंबिवली : सत्ता राज्यातील असो अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील, शिवसेना-भाजपातील सत्तासंघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नाही. कल्याण-डोंबिवलीतील राजकारणात याचा प्रत्यय रविवारी पुन्हा एकदा आला. यावेळी निमित्त होते शिकस्त इमारतीतील शिधावाटप कार्यालय पश्चिमेकडील विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या इमारतीत स्थलांतर करण्याचे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या कार्यालयाचा शुभारंभ होणार होता. परंतु, कार्यालय स्थानांतरणाचा कार्यक्रम प्रत्यक्षात होऊच शकला नाही. यामागचे ठोस कारण समजू शकलेले नसले, तरी यासाठी शिवसेनेनेच आडकाठी आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज्यमंत्री चव्हाण यांच्यावर कार्यक्रम रद्द करण्याची नामुश्की ओढावल्याने हा संघर्ष अधिक पेटण्याची चिन्हे आहेत.
पश्चिमेतील भागशाळा मैदानालगत असलेल्या शिधावाटप कार्यालयाची वास्तू जुनी झाल्याने कर्मचाऱ्यांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. दरवर्षी पावसाचे पाणीही साचत असल्याने हे कार्यालय रेल्वेस्थानकासमोरील जुन्या विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या इमारतीत तळ मजल्यावर हलवण्यात येणार होते. त्याअनुषंगाने डोंबिवलीचे आमदार आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या आदेशानुसार शिधावाटप कार्यालयाचे स्थलांतर रविवारी केले जाणार होते. सकाळी ९ वाजता चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यालय उद्घाटनाचा कार्यक्रम होणार होता. परंतु, त्यांना ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करावा लागला. विशेष बाब म्हणजे या इमारतीच्या बाहेर लावलेले शिधावाटप कार्यालयाचे फलकही तेथून काढण्यात आले आहे. दरम्यान, १९८९ साली बांधण्यात आलेली विष्णुनगर पोलीस ठाण्याची इमारत दोन वर्षांपूर्वी केलेल्या स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे येथील विष्णुनगर पोलीस ठाण्याचे स्थानांतरण आनंदनगर येथे करण्यात आले आहे. त्यामुळे अशा धोकादायक इमारतीत शिधावाटप कार्यालय कशासाठी, असा सवाल शिवसेनेचे नगरसेवक मोरे यांनी केला होता. या हरकतीमुळेच स्थानांतरण बारगळल्याची चर्चा आहे.
संबंध नाही
दरम्यान, यासंदर्भात राजेश मोरे यांच्याशी संपर्क साधला असता कार्यक्रम रद्द होण्यामागे शिवसेनेचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. कार्यालय हे धोकादायक इमारतीत हलवण्यात येणार असल्याने हरकत नोंदवली होती. महापालिकेकडे अन्य सुसज्ज अशा इमारती असून तेथे हे कार्यालय तातडीने स्थानांतरित करावे. चांगल्या जागेत कार्यालय गेल्यास कर्मचारी आणि नागरिकांना दिलासा मिळेल, असे मोरे म्हणाले.
राज्यमंत्र्यांकडून प्रतिसाद नाही : कार्यालय स्थलांतराच्या शुभारंभाचा कार्यक्रम रद्द झाल्याप्रकरणी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मोबाइलवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.