राजकारणाने गाजले पोलीस ठाण्यांचे स्थलांतर
By admin | Published: May 2, 2017 02:18 AM2017-05-02T02:18:50+5:302017-05-02T02:18:50+5:30
डोंबिवलीतील टिळकनगर आणि विष्णूनगर पोलीस ठाण्यांच्या स्थलांतराला झालेला विरोध मावळत नाही तोच सोमवारी स्थलांतराचा
कल्याण : डोंबिवलीतील टिळकनगर आणि विष्णूनगर पोलीस ठाण्यांच्या स्थलांतराला झालेला विरोध मावळत नाही तोच सोमवारी स्थलांतराचा सोहळा पक्षीय राजकराणावरून चांगलाच गाजला. मात्र, या सोहळ््याच्या निमंत्रण पत्रिकेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना डावलल्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेने निदर्शने करत पोलिसांचा निषेध केला. पोलीस सत्ताधारी भाजपाच्या दबावाला बळी पडल्याचा आरोपही त्यांनी केला. अखेर पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी, गैरसमजुतीतून हा प्रकार घडला आहे. याबद्दल आपण पालकमंत्र्यांची माफी मागत असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात जाहीर केले.
पूर्वेतील रामनगर परिसरातील टिळकनगर पोलीस ठाणे पाथर्ली परिसरात तर पश्चिमेकडील विष्णूनगर पोलीस ठाणे हे आनंदनगर परिसरातील नव्या वास्तूत महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर सोमवारी स्थलांतर करण्यात आले. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, पोलीस आयुक्त परमबीर सिंह, केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत, सहपोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अप्पर पोलीस आयुक्त सत्यनारायण, कल्याणचे पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
मात्र, निमंत्रण पत्रिकेत पालकमंत्री शिंदे, कल्याणचे खासदार डॉ, श्रीकांत शिंदे आणि स्थानिक कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांची नावे नव्हती. ही बाब निदर्शनास येताच डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी, केडीएमसीचे सभापती रमेश म्हात्रे, सभागृहनेते राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख व माजी नगरसेवक सदानंद थरवळ, प्रकाश तेलगोटे, वैशाली दरेकर-राणे, तात्या माने, संतोष चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळ््या फिती लावत कार्यक्रमस्थळी पोलिसांविरोधात निदर्शने केली. ज्या पोलीस अधिकाऱ्याने हा खोडसाळपणा केला त्याच्याविरोधात हक्कभंग आणावा, अशाप्रकारचे निवेदन पालकमंत्र्यांना देणार असल्याचे शहरप्रमुख चौधरी यांनी सांगितले. काँगे्रसच्या राज्यात असा प्रकार घडला नव्हता. आमचा मित्रपक्ष भाजपाच असे डाव खेळत असून त्यांच्या दबावाखाली पोलिसांनी हे पक्षीय राजकारण खेळल्याचा आरोप या वेळी थरवळ यांनी केला. आयुक्त सिंह यांच्या कार्यक्रमस्थळी येण्याच्या मार्गात शिवसैनिकांनी हे आंदोलन छेडल्याने सिंह, चव्हाण आणि अन्य पोलीस अधिकाऱ्यांच्या वाहनांना अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. परंतु, पोलीस अधिकारी आणि वाहतूक पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखून धरल्याने त्यांची वाहने विनाअडथळा मार्गस्थ झाली. दरम्यान, राज्यमंत्री चव्हाण यांनी, भाजपाने पोलिसांवर दबाव आणल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. (प्रतिनिधी)
पोलीस मित्र बना : याआधीच्या वास्तू धोकादायक तसेच सोयीस्कर नव्हत्या. त्यामुळे आताच्या नव्या वास्तूच्या चांगल्या वातावरणात आहे. त्यामुळे सेवेचा दर्जाही चांगला ठेवला जाईल. पोलीस ठाण्याच्या स्थलांतराला काहींचा विरोध होता. परंतु, त्यांची शांतता भंग होणार नाही तसेच नागरिकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही. उद्भवलेल्या वादात पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर राजेंद्र देवळेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले, जास्तीत जास्त नागरिकांनी पोलीस मित्र बनावे, असे आवाहन आयुक्त सिंह यांनी केले. तर सर्वांसाठी घरे याप्रमाणे पोलिसांनाही आता हक्काची घरे देण्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा मानस असल्याचे राज्यमंत्री चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
महापौरांची पाठ : भाजपाची छाप
या सोहळ््याला महापौर राजेंद्र देवळेकर यांनाही आमंत्रित केले होते. परंतु, निमंत्रण पत्रिकेवरून उद्भवलेला वाद पाहता त्यांनीही कार्यक्रमाला जाणे टाळले. दरम्यान, या सोहळ््यात भाजपाचे पदाधिकारी आणि नगरसेवकांची छाप दिसली. राज्यमंत्री चव्हाण, भाजपाच्या स्थानिक नगरसेविका सायली विचारे, निलेश म्हात्रे, संदीप पुराणिक, राजन आभाळे आदी नगरसेवकांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. नवीन पोलीस ठाण्याच्या निर्मितीला सहकार्य करणाऱ्या नागरिकांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
बॅनर आणि दुसऱ्या पत्रिकेत नावांचा उल्लेख
निमंत्रण पत्रिकेवरून उद्भवलेला वाद पाहता कार्यक्रमस्थळी बॅनरवर मात्र खासदार शिंदे आणि आमदार भोईर यांची नावे होती. परंतु, पालकमंत्र्यांचे नाव नव्हते. तसेच नाव नसल्याची चूक निदर्शनास येताच तातडीने चूक सुधारून नव्याने पत्रिका छापल्या, मात्र त्यातही पालकमंत्र्यांचे नाव डावलले होते.
पुनमियांकडून सायकली भेट
विक्रमवीर सायकलपटू विनोद पुनमिया यांनी टिळकनगर पोलिस ठाण्यासाठी तीन आधुनिक सायकली भेट दिल्या. २४ गीअर असलेल्या या सायकली गस्तीसाठी वापरल्या जाणार आहेत. त्यावर यावर मोबाइल स्टॅण्ड असून, लवकरच त्यावर सायरनही लावला जाईल, असे पुनमिया यांनी सांगितले.