अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी मायलेकांना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:46 AM2021-08-13T04:46:22+5:302021-08-13T04:46:22+5:30

ठाणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून धमकावून बेकायदेशीररीत्या घरात डांबून ठेवणाऱ्या तिघा मायलेकांना ठाणे विशेष पोस्को न्यायालयाच्या न्यायाधीश ...

Mileka sentenced for sexually abusing a minor girl | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी मायलेकांना शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी मायलेकांना शिक्षा

Next

ठाणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून धमकावून बेकायदेशीररीत्या घरात डांबून ठेवणाऱ्या तिघा मायलेकांना ठाणे विशेष पोस्को न्यायालयाच्या न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी गुरुवारी दोषी ठरवून वेगवेगळी शिक्षा सुनावली. यामध्ये अत्याचार करणाऱ्या इशरत अन्सारी (२२, रा. भिवंडी) याला सात वर्षे सश्रम कारावासाची, तर धमकावून घरात बेकायदेशीररीत्या डांबल्याप्रकरणी त्याची आई निलोफर (६०) आणि भाऊ अर्शद अन्सारी (२५) अशा तिघांना प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

भिवंडीतील ही १६ वर्षीय पीडित मुलगी तिच्या भावाकडे वास्तव्यासाठी आली होती. याच काळात २८ मार्च २०१८ रोजी ती दुकानात जात असताना, त्याच भागातील इशरत याने तिला त्याच्या घरात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच तिला मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर तिला घरात डांबून ठेवले. त्यानंतर घरी आलेल्या इशरतची आई निलोफर आणि भाऊ अर्शद यांना या पीडितेने आपल्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला. त्यांनीही तिला धमकावून रात्रभर घरात डांबून ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्शदने घरातून तिला बाहेर रस्त्यावर सोडले. त्यानंतर भावाच्या मदतीने तिने भोईवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.व्ही. पुजारी यांच्या पथकाने तिघांनाही अटक केली. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर याच खटल्याची सुनावणी गुरुवारी झाली. विशेष पोस्को न्यायाधीश शिरभाते यांच्यासमोर आठ साक्षीदारांची साक्ष आणि पुरावे ग्राह्य मानून यातील तिघांनाही वेगवेगळ्या कलमान्वये दोषी ठरविण्यात आले. यात अपहरण आणि लैंगिक अत्याचारप्रकरणी इशरत याला सात वर्षे सश्रम कारावासाची तसेच एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली, तर दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची अतिरिक्त शिक्षा सुनावली. तसेच अन्य एका कलमात दोन वर्षे सक्तमजुरी व एक हजार दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना साधी कैदेची शिक्षा सुनावली. तर इशरतला मदत करणाऱ्या त्याची आई आणि भावालाही प्रत्येकी एक हजार दंड आणि तो न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. सरकारी वकील संजय मोरे यांनी आरोपींना शिक्षा मिळण्यासाठी जोरदार बाजू मांडली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पुजारी यांनी तर न्यायालयीन कारकुनीचे काम पोलीस हेडकॉन्स्टेबल शेवाळे आणि तोटेवाड यांनी केले.

Web Title: Mileka sentenced for sexually abusing a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.