दुचाकीवरून जात असलेल्या मायलेकीला ट्रकची धडक, तरुणीला गमवावा लागला पाय
By पंकज पाटील | Published: March 22, 2024 05:01 PM2024-03-22T17:01:30+5:302024-03-22T17:02:35+5:30
मनाचा थरकाप उडवणाऱ्या या अपघातात दोघींचा जीव बचावला असला तरी तरुणीला पाय गमवावा लागला आहे.
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. पूर्वेच्या समर्थ चौकात मालवाहू ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे ट्रॅकवरील नियंत्र सुटले आणि हा भरधाव वेगातील ट्रक दुचाकीवरून जाणाऱ्या मायलेकींना धडकला. मनाचा थरकाप उडवणाऱ्या या अपघातात दोघींचा जीव बचावला असला तरी तरुणीला पाय गमवावा लागला आहे.
अंबरनाथ स्वामी समर्थ चौक हा नेहमीच वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत आहे. या ठिकाणी शिवमंदिराच्या दिशेने तीव्र उतार असल्यामुळे त्या चौकात वाहनांवर नियंत्रण मिळवणे अवघड जाते. त्यातच एका मालमहू ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने तो दुचाकीला धडकला. या भीषण अपघातात वीस वर्षीय सिनिग्धा असलेकर या तरुणीच्या पायावरून ट्रकव्हे चाक गेल्याने तिचा पाय पूर्णपणे निकामी झाला आहे. तर दुचाकीवर मागे बसलेली तिची आई (५२) प्रतिपदा असलेकर यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की अपघात स्थळी असलेल्या समर्थ चौकातून हा नियंत्रण सुटलेला ट्र्क दुचाकीवाहनाला फरपटत गोविंद पुलापर्यंत घेऊन गेला.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून दोन्ही जखमींना तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आता त्यांना पुढील उपचारासाठी ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
- ज्या क्षणाला हा अपघात घडला त्यावेळेस तीन ते चार दिवसाची आजूबाजूला होत्या मात्र ट्रक रॉंग साईडने आल्याने या मायलेकींना ट्रकचा अंदाज आला नाही आणि त्या ट्रक खाली गेल्या.
- नेमका ट्रकचा ब्रेक फेल झाला होता की नाही याबाबत अद्यापही पोलिसांनी कोणतीही माहिती दिली नसली तरी ट्रकच्या चालकाला अटक करण्यात आली आहे.
- ट्रक अनियंत्रित होत असल्याचे लक्षात येताच ट्रकचा क्लिनर याने अपघातानंतर लागलीच चालत्या ट्रक मधून उडी मारून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.