भातपिकावरील ‘लष्करी’मुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 12:29 AM2020-09-10T00:29:43+5:302020-09-10T00:29:52+5:30
कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी मार्गदर्शनासाठी शेतीच्या बांधावर
बोर्डी : मागील चार ते पाच वर्र्षांपासून तालुक्यात भात कापणीला येण्याच्या काळात लष्करी आळीचा प्रादुर्भाव होत असल्याचे आढळून आले आहे. या अळीमुळे पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. दरम्यान, कोसबाड कृषी विज्ञान केंद्र, तालुका कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकºयांसाठी लष्करी अळी व्यवस्थापन जनजागृतीपर मार्गदर्शन शेतीच्या बांधावर करण्यात आले.
या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील डहाणू मंडळाअंतर्गत अस्वाली, खुणवडे, जांबुगाव, जळवाई तसेच सारणी, निकावाली येथ बुधवार, ९ सप्टेंबर रोजी शेतकºयांना या लष्करी अळीच्या व्यवस्थापनाकरिता जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव, पीक संरक्षण तज्ज्ञ प्रा. उत्तम सहाणे यांनी लष्करी अळीचा प्रादुर्भाव व नियंत्रणाच्या सोप्या पद्धती याविषयी सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी डहाणूचे मंडळ अधिकारी सुनील बोरसे, उमेश पवार, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नामदेव वाडीले, अशोक महाले, कृषी सहाय्यक संदीप धामोडे, विशाल नाईक, सचिन नाठे यांनी शेतकºयांना विकेल ते पिकेल या नवीन योजना अभियानासंबंधी मार्गदर्शन केले.
उपाययोजना
पक्षीथांबे, प्रकाश सापळे व कामगंध सापळे लावून किडीचे पतंग व अळ्या नियंत्रित केल्या जाऊ शकतात. शेताचे बांध स्वच्छ ठेवावे. बांधावर मिथाइल पाराथिआॅन २ टक्के किंवा क्विनोलफॉस १.५ टक्के या कीटकनाशकाची धुरळणी करावी. लष्करी अळीचा प्रादुर्भाव जास्त वाढला तर निमतेल २.५ मिली किंवा रासायनिक कीटकनाशक प्रोफेनोफोस (५० इसी) १.५ मिली किंवा क्विनोल्फोस (२५ ईसी) २.५ मिली प्रतिलीटरप्रमाणे फवारणी करावी.