बाजार समितीत सेना विजयी
By admin | Published: February 16, 2017 01:58 AM2017-02-16T01:58:57+5:302017-02-16T01:58:57+5:30
भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत शिवसेनाप्रणीत महाआघाडीने एकूण १८ पैकी ११ जागा जिंकत बाजी
अंबाडी : भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत शिवसेनाप्रणीत महाआघाडीने एकूण १८ पैकी ११ जागा जिंकत बाजी मारली. त्यामुळे येथे अनेक वर्षे भाजपा खासदार कपिल पाटील यांच्या एकहाती वर्चस्वाला धक्का बसला आहे.
भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. यामध्ये कृषी व बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघात एकूण ३२१ पैकी ३१७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ग्रामपंचायत मतदारसंघात ११५६ पैकी ११३२ मतदारांनी मतदान केले, तर व्यापारी व आडते मतदारसंघात ११२ पैकी १०७ मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी भिवंडीतील राजया गाजेंगी सभागृहात झाली.
शिवसेनाप्रणीत शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँॅग्रेस, काँॅग्रेस, श्रमजीवी संघटना, कुणबीसेना या सर्वपक्षीय महाआघाडीच्या शेतकरी विकास परिवर्तन पॅनलने एकूण १८ पैकी ११ जागा जिंकून बाजी मारली आहे. तर, खासदार पाटील यांच्या सहकार पॅनलला केवळ सात जागांवर समाधान मानावे लागले.
ग्रामपंचायत मतदारसंघात भाजपाचे संतोष जाधव व महाआघाडीच्या सुनीता भावर तसेच कृषी व बहुउद्देशीय सहकारी संस्था या मतदारसंघात भाजपाचे दयानंद पाटील व महाआघाडीचे विष्णू पाटील, तर कृषीच्याच सर्वसाधारण जागेतील सातव्या क्रमांकासाठी महाआघाडीचे अनंता भागोजी पाटील व महाआघाडीचेच मोहन मणेरा यांना एकसमान मते मिळून भाजपाचे संतोष जाधव व दयानंद पाटील, अनंता पाटील चिठ्ठीद्वारे निवडून आले. (वार्ताहर)