बैलगाडा शर्यतीत लागला लाखोंचा सट्टा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश बसवले धाब्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 03:09 PM2022-03-29T15:09:09+5:302022-03-29T15:09:20+5:30
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश बसवले धाब्यावर : प्रशासनाकडे कारवाईची मागणी
बदलापूर : बदलापुरात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून सुमारे ३५ ते ४० लाखांचा सट्टा खेळला गेल्याची चर्चा सुरू आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवताना या शर्यतींमध्ये जुगार खेळू नये किंवा पैशांवर शर्यती लावू नयेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे ठाण्याचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांनी या शर्यतींची चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.
ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन बदलापुरात शिवजयंतीचे निमित्त साधून अधिकृत बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच परवानगी घेऊन बैलगाडा शर्यत भरवण्यात आल्याने हजारोंच्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी शर्यतींचा आनंद घेण्यासाठी आले होते. एवढेच नव्हे तर या शर्यतीमध्ये सुमारे ५०० बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत शर्यतींचा धुराळा उडाला.
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवत असताना काही अटी आणि शर्ती घातल्या होत्या. त्याच अटीच्या आधारावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली; मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत बदलापुरात शर्यत भरविण्यात आली. शिवजयंतीच्या शतकोत्सव समारंभाचे निमित्त साधून ही स्पर्धा भरवण्यात आली.
रीतसर परवानगी दिलेली असतानाही आयोजकांनी परस्पर पैशांवर शर्यती खेळवल्याने यासंदर्भात पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय कोणती ठोस कारवाई करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राज्यभरातून नावाजलेले बैल या स्पर्धेत सहभागी झाल्याने या ठिकाणी लाखोंचा जुगार बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून खेळला गेला आहे. या चुकीच्या प्रथेमुळेच बैलगाडा शर्यतीच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे.
बदलापुरात पैशांचा चुराडा
सकाळी सुरू झालेल्या स्पर्धेत एकाचवेळी दोन स्पर्धकांचे बैल स्पर्धेसाठी उतरविण्यात येत होते. या दोन बैलांच्या शर्यतीवर प्रत्येक बैल मालक पैसा लावत होता. आयोजक या पैशांची वसुली करून त्याच्या मोबदल्यात त्यांना कूपन (टोकन) देत होते. स्पर्धा झाल्यानंतर जो बैल ही स्पर्धा जिंकतो त्या बैलाच्या मालकाला निश्चित केलेली रक्कम दिली जाते. मात्र ही रक्कम देताना आयोजक १० ते २० टक्के रक्कम आयोजनाचा खर्च म्हणून कापून घेत असतो.
बदलापूरमध्ये आयोजित स्पर्धेमध्ये बैलगाड्या शर्यतीसोबतच मैदानाच्या परिसरात पत्त्यांचा जुगार मांडण्यात आला होता. नागरिकांची जुगार खेळण्यासाठी गर्दी झाली होती. नेमकी ही स्पर्धा मनोरंजनासाठी होती की जुगार, सट्टा खेळण्यासाठी होती, अशी चर्चा यामुळे सुरू झाली आहे. शर्यतीच्या ठिकाणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये पत्त्यांचा जुगार आणि बैलगाडी शर्यतीवर पैशांचा जुगार खेळला जात होता. असे असतानादेखील जुगार व सट्टा का रोखण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.