कोट्यवधींचा खर्च खड्ड्यांत

By admin | Published: April 17, 2017 04:49 AM2017-04-17T04:49:43+5:302017-04-17T04:49:43+5:30

भिवंडीतील विविध विकासकामांसाठी राज्य सरकारच्या विविध विभागांकडून भिवंडी महापालिकेस २००६ ते २०१३ या सात वर्षांसाठी एक अब्ज ३३ कोटी १५ लाख ५६ हजार २७२

Millions of crores of expenditure | कोट्यवधींचा खर्च खड्ड्यांत

कोट्यवधींचा खर्च खड्ड्यांत

Next

रोहिदास पाटील, अनगाव
भिवंडीतील विविध विकासकामांसाठी राज्य सरकारच्या विविध विभागांकडून भिवंडी महापालिकेस २००६ ते २०१३ या सात वर्षांसाठी एक अब्ज ३३ कोटी १५ लाख ५६ हजार २७२ रुपये इतका निधी देण्यात आला. याच काळात रस्त्याच्या कामासाठी २६ कोटींचे अनुदान राज्य आणि केंद्र सरकारकडून पालिकेला मिळाले होते. कोट्यवधी खर्चूनही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहनचालकांना खड्डे वाचवत वाहने चालवावी लागतात. मग, रस्त्यासाठी आलेला निधी गेला कुठे, असा प्रश्न भिवंडीचे नागरिक विचारत आहे.
भिवंडी नगरपालिका असताना कामकाजावर जिल्हाधिकारी, कोेकण आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष असायचे. पण, महापालिकेत रूपांतर झाल्यामुळे अधिकारी व नगरसेवकांचे चांगलेच फावले. अनेक कामे न करताच कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखवत भ्रष्टाचार केल्यामुळे आज पालिका डबघाईस आली आहे.
विद्यमान आयुक्तांच्या मते ८०० कोटींची देणी असल्याचे यावर्षीच्या अर्थसंकल्पात नमूद केले आहे. १५ वर्षांत प्रशासनाने सुचवलेल्या करवाढीचे प्रस्ताव महासभेने फेटाळले. परिणामी, उत्पन्नात वाढ होत नसल्याने कर्मचाऱ्यांचे पगारच वेळेत देता येत नसल्याने विकासकामांना पैसे कुठून आणणार, असा प्रशासनापुढे प्रश्न असल्याने विकासकामे खोळंबली आहेत.
चौदाव्या वित्त आयोगातून अंजूरफाटा ते वंजारपट्टीनाका रस्त्याच्या डांबरीकरणासाठी साडेआठ कोटी २०१६ मध्ये खर्च करण्यात आले. तरीही, रस्त्याची दुरवस्था झाली आहे. शांतीनगर रस्त्याची दुरवस्था झाल्याने खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महिनाभरापूर्वी रिक्षाचालकांनी बंद पुकारला होता. सहा महिन्यांतच रस्ता खराब होत असेल, तर नागरिकांनी कुणाकडे दाद मागायची, असा प्रश्न रिक्षा युनियनने केला आहे. कल्याणनाका ते साईबाबा पाइपलाइन रस्त्याच्या डांबरीकरणाकरिता साडेतीन कोटी खर्च करण्यात आले. आज या रस्त्यात खड्डे पडले आहेत.सध्या या रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.
अंजूरफाटा ते वंजारपट्टीनाका रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून त्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
महापालिकेत २० वर्षांपासून रस्ते, भुयारी गटारांची कामे बुबेरे असोसिएट, कचेरनाथ मजूर संस्था, कांबे आदिवासी मजूर संस्था करत आहे. अनेक कामांचे कंत्राट याच संस्थांना दिले जात आहे. यांची चौकशी केल्यास कोट्यवधींचा भ्रष्टाचार समोर येईल, अशी माहिती भिवंडी विकास मंचचे अध्यक्ष शरद पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
जुना आग्रा रोड ते शांतीनगर पाइपलाइन रस्त्यापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण व दुरुस्तीसाठी पालिकेने ७२ कोटी १७ हजार ६८६ इतका निधी खर्च केला आहे. प्रत्यक्षात रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मग, हा निधी गेला कुठे, असा प्रश्न विचारला जात आहे.
विविध विकासकामांसाठी सात वर्षांत महापालिकेस अब्जावधींचे अनुदान मिळाले आहे. तो निधी खर्चही करण्यात आला आहे. तरीही, विकासकामे झालेली नाहीत. तो निधी कुठे खर्च झाला, याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र जनरल युनियनचे अध्यक्ष महेंद्र कुंभारे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Web Title: Millions of crores of expenditure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.