हायटेक योजनांसाठी शिक्षण विभागाची कोट्यवधींची उधळण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 01:16 AM2019-07-19T01:16:10+5:302019-07-19T01:16:22+5:30
पटसंख्येत घट होत असतानाही त्याकडे लक्ष देण्याऐवजी शिक्षण मंडळाच्या माध्यमातून विविध नवनवीन योजनांचा फंडा आणून कोट्यवधींची उधळण करण्याचा घाट घातला जात आहे.
ठाणे : ठाणे महापालिका शाळांची अवस्था दयनीय असताना, पटसंख्येत घट होत असतानाही त्याकडे लक्ष देण्याऐवजी शिक्षण मंडळाच्या माध्यमातून विविध नवनवीन योजनांचा फंडा आणून कोट्यवधींची उधळण करण्याचा घाट घातला जात आहे. परंतु, या योजना कितपत यशस्वी होणार, याबाबत शंका उपस्थित केल्या जात असून यावरून शुक्रवारच्या महासभेत वादंग निर्माण होणार आहे.
महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या यापूर्वी ३७ हजारांच्या वर होती. आजघडीला ती २७ ते २८ हजारांच्या घरात आली आहे. काही शाळांची अवस्था दयनीय आहे. शौचालयांना कडीकोयंडा नाही. दाटीवाटीने भरणारे वर्ग, धोकादायक असलेल्या शाळांच्या इमारती अशा परिस्थितीत अनेक शाळा आहेत. असे असताना या सुविधा देण्याऐवजी हायटेक योजना राबवून त्यातून मलिदा लाटण्याचा प्रकार शिक्षण विभागाकडून सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यानुसार, महापालिका मराठी माध्यमाच्या शाळांतील अमराठी, परप्रांतीय व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गरज लक्षात घेऊन स्कॅफहोल्डिंग ही योजना राबवण्यात येणार आहे. महापालिका शाळांमध्ये ६१७६ अमराठी विद्यार्थी आहेत. त्यानुसार, या योजनेंतर्गत त्यात्या भाषेतून सेवानिवृत्त झालेल्या मात्र मराठी भाषेवर प्रभुत्व असलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांना शाळेमध्ये १० हजार मानधनावर ठेवण्यात येणार आहे. यासाठी ५० ते ६० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक याप्रमाणे ९० सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी ९० लाखांचा खर्च दरवर्षी केला जाणार आहे.
तर, झोपडपट्टी भागातील विद्यार्थ्यांसाठी गल्ली आर्ट स्टुडिओची निर्मिती केली जाणार असून यात किती विद्यार्थी सहभागी होतील, यावर आतापासूनच शंका उपस्थित केल्या जात आहेत. यासाठी २५ लाखांचा खर्च केला जाणार आहे. उद्याची महासभा वादळी ठरणार असल्याने याकडे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
>अंध विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजना केवळ चांगल्या
दीपस्तंभ शाळा योजनाही राबवण्यात येणार असून त्यानुसार प्रत्येक शाळेने शाळेसभोवतालचा १०० मीटर परिसर दत्तक घेऊन त्या परिसराची देखभाल करावी. एकही मूल शाळाबाह्यराहणार नाही, याची काळजी घेणे, आदींसह इतर कामे केली जाणार आहे. त्यानुसार, ज्या शाळा यात यशस्वी होतील, त्यांना प्रत्येकी ५० हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्यानुसार, यासाठी २५ लाखांची तरतूद करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. अंध विद्यार्थ्यांसाठी संभाषणकौशल्य, कॉलसेंटर कामकाज प्रशिक्षण, मसाज, संगणक प्रशिक्षण, रोजगार प्रशिक्षण आदी स्वरूपाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यातल्या त्यात ही योजना चांगली म्हणावी लागणार आहे. इतर योजनांचा मात्र पुरता बोजवारा उडणार, हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे अंध विद्यार्थ्यांसाठीची योजना वगळता इतर योजनांवरून आजच्या महासभेत वादंग निर्माण होणार असल्याचे दिसत आहे. महापालिका क्षेत्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शहर वैविध्यता दर्शन योजनेंतर्गत ५ वी ते ८ वीतील विद्यार्थ्यांना तसेच महापालिकेच्या सामाजिक दीपस्तंभ शाळा या योजनेतील ५० शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ठाणे शहराचा भौगोलिक इतिहास तसेच शहरातील विविध कला व संस्कृतींची ओळख व शहरातील विविधतेचे दर्शन घडवण्यासाठी परिवहनसेवेच्या सहकार्यातून ही योजना राबवली जाणार आहे. यासाठी तब्बल एक कोटींचा चुराडा केला जाणार आहे. हॅप्पीनेस इंडेक्स वाढविणे या योजनेखाली मोबाइल लायब्ररी या प्रकल्पांतर्गत महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी फिरती लायब्ररी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीसुद्धा एक कोटीचा चुराडा केला जाणार आहे. दप्तराचे ओझे कमी करणे, ही योजना १ ली ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राबविली जाणार आहे. या योजनेंतर्गत सर्व विषयांचे एकच मासिक पुस्तक याप्रमाणे महिनावार अभ्यासक्रमानुसार पुस्तकांचा पुरवठा करण्यात येणार आहे. दोन वर्षांसाठी या योजनेसाठी तीन कोटी तीन लाख ७७ हजार आठ रुपयांचा खर्च केला जाणार आहे.