लाखोंचा फायबर फुले अन शिल्पाकृती घोटाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 12:43 AM2019-09-06T00:43:00+5:302019-09-06T00:43:36+5:30
विनानिविदा लाखोंची कामे : आयुक्तांच्या हेतूवर भाजपचा संशय
ठाणे : थीम पार्क घोटाळ्यावर अद्याप पडदा पडला नसताना आता ठाणे महापालिकेचा आणखी एक घोटाळा समोर आला आहे. माजिवडानाका उड्डाणपुलाखाली बसवलेल्या एका फायबरच्या फुलासाठी ठाणे महापालिकेने तब्ब्ल सव्वासहा हजार रुपये खर्च केले असल्याची धक्कादायक माहिती भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी गुरुवारी उघड केली. अशा प्रकारची २४५ फुले या उड्डाणपुलाखाली लावली असून १५ लाख ४० हजार रु पयांचे बिलदेखील संबंधित कंपनीला अदा केले आहे.
विशेष म्हणजे हे काम महापालिका अधिनियम अनुसूची (ड) प्रकरण ५-२-२ अन्वये केले असून केवळ हेच काम नव्हे तर अशाच प्रकारे प्रत्येकी सात लाख २७ हजार रु पये खर्च करून कलात्मक शिल्पाकृतीही चार ठिकाणी बसवल्या आहेत. त्यामुळे ही कामे तातडीने करण्याची आवश्यकता काय होती, अशी माहिती त्यांनी पालिका आयुक्तांकडून मागवली असून यासंदर्भात पाटणकर यांनी राज्याचे प्रधान सचिव यांनादेखील पत्र पाठवले आहे.
ठाणे पालिकेत प्रशासन विरु द्ध लोकप्रतिनिधी असा वाद पेटला असून शिवसेनेने प्रशासनाच्या विरोधात आक्र मक भूमिका घेतली आहे. त्यापाठोपाठ आता भाजपनेही प्रशासनाच्या गैरव्यवहारांचा पाढा वाचण्याचा निर्णय घेतला असून गुरुवारी गटनेते नारायण पवार आणि मिलिंद पाटणकर यांनी उड्डाणपुलाखालील लावलेल्या १५ लाख ४० हजारांच्या फायबरच्या फुलांची पाहणी केली. मे. ओरियन इंडिया आटर््स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हे सुशोभीकरणाचे काम देण्यात आले होते.
तलावाकाठी बसवलेली शिल्पे वादात
पालिकेने कापूरबावडी जंक्शनसह ब्रह्माळा, आंबेघोसाळे, कचराळी या तलावांच्या ठिकाणी प्रत्येकी सात लाख २८ हजार रु पये खर्च करून कलात्मक शिल्पाकृती बसवली असून ते कामही ओरियन या कंपनीला देण्यात आले आहे. ही २९ लाखांची शिल्पं नक्की कुठे आहेत, हेच समजत नसून ते कामही ५-२-२ कलमाचा आधार घेऊन करण्याचे प्रयोजन काय होते, असा सवालही त्यांनी केला आहे.
विनानिविदा काम देण्यामागे आयुक्तांचा हेतू काय?
तिथल्या सात उद्यानांमध्ये अर्धा चौरस फूट आकाराची २४५ कलात्मक शिल्पाकृती बसवण्याचा हा प्रस्ताव पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला होता. या कामासाठी कोणत्याही निविदा प्रसिद्ध केल्या नव्हत्या. पालिका आयुक्तांनी महापालिका अधिनियम अनुसूची (ड) प्रकरण ५-२-२ अन्वये हे काम ओरियन या कंपनीला बहाल केले होते. या कलमाचा वापर पूर, भूकंप आदी आपत्कालीन परिस्थितीत करण्याचा अधिकार आयुक्तांना असून यापूर्वी अशा पद्धतीच्या कामांसाठी कोणत्याही आयुक्तांनी त्याचा आधार घेतलेला नाही. हे काम आठ दिवसांऐवजी आठ महिन्यांत झाले असते, तर पालिकेवर कोणते आभाळ कोसळले असते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्याशिवाय, कलात्मक शिल्पांच्या नावाखाली या ठिकाणी फायबरसदृश पदार्थांपासून तयार केलेली फुले बसविण्यात आली आहे. त्यांची किंमत वाजवीपेक्षा जास्त असून एका विशिष्ट कंपनीला काम देण्यामागे विशेष रु ची असल्याचा संशयही पाटणकर यांनी व्यक्त केला. त्याबाबतचे पत्र पालिका आयुक्तांना दिले आहे.
१०० रुपयांचे फुल ६२३६ रुपयांना
पालिकेने ओरियन कंपनीला २४५ फुलांसाठी १५ लाख २८ हजार रु पये मोजले आहेत. एका फुलासाठी तब्बल सहा हजार २३६ रु पये अदा केले आहे. या फुलाची बाजारातली किंमत १०० रु पयांपेक्षा जास्त नसेल, असा दावा पाटणकर यांनी केला आहे. त्यामुळे या तथाकथित शिल्पाकृतींची किंमत कुणी आणि कशी ठरवली, असा प्रश्न त्यांनी केला आहे.