तोट्याअभावी लाखो लीटर पाणी जातेय गटारात
By admin | Published: May 3, 2017 05:31 AM2017-05-03T05:31:17+5:302017-05-03T05:31:17+5:30
शहरात तोटयाविना नळातून लाखो लिटर पाणी गटारात जात आहे. काही प्रभागात नगरसेवकांनी स्वखर्चाने नळाच्या तोटया लावल्या असून
उल्हासनगर : शहरात तोटयाविना नळातून लाखो लिटर पाणी गटारात जात आहे. काही प्रभागात नगरसेवकांनी स्वखर्चाने नळाच्या तोटया लावल्या असून पाणीटंचाईच्या निषेधार्थ भारिपाच्या नगरसेविका कविता बागूल यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा पालिका आयुक्तांना दिला आहे. पालिकेचा पाणी पुरवठा विभाग नसल्यातच जमा असल्याची टीका होत आहे.
उल्हासनगरचे पाणीटंचाईचे ग्रहण सुटता सुटत नाही. पालिकेने पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी एमआयडीसीकडे वाढीव पाण्याची मागणी केली. तर दुसरीकडे नियोजनाअभावी लाखो लिटर पाणी गटारात जात आहे. शहरात ३०० कोटीच्या पाणीपुरवठा योजनेतंर्गत नवीन जलवाहिन्या टाकून प्रत्येक घरी, दुकान व कारखान्यांना निळया रंगाच्या पाईपमधून नळजोडण्या दिल्या आहेत. पालिकेने निळया रंगाच्या पाईपमधून नळजोडणी दिल्यावर जुन्या नळजोडण्या खंडीत करणे गरजे होते. मात्र तसे पालिकेने केले नाही. जुन्या व नवीन जलवाहिन्यांतून पुरवठा करीत आहे.
नागरिक दोघांचाही उपयोग करीत आहेत. तर काही नागरिकांनी जुन्या नळजोडणीतून पाणीपुरवठा होत असल्याने नवीन जोडण्या घेतल्या नाहीत. अशा हजारो बेवारस तोटयाविना असलेल्या निळया रंगाच्या पाईपमधून लाखो लिटर पाणी गटारात जात आहे.
तत्कालिन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दौरा केला असता हा प्रकार उघड झाला. त्यांनी अशा नळजोडण्या बंद करण्याच्या अथवा त्यांना तोटया बसविण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्यापही विभागाने तोटया लावलेल्या नाहीत. अथवा नळजोडण्या खंडित केलेल्या नाहीत. (प्रतिनिधी)
स्वखर्चातून बसविल्या तोट्या
प्रभाग क्रमांक १८ च्या भारिपच्या नगरसेविका कविता बागूल यांनी पती व समाजसेवक सुधीर बागूल यांच्यासह कार्यकर्त्यांच्या मदतीने सुभाष टेकडी परिसरातील निळया पाईपला तोटया बसविल्या आहेत.
तसेच प्रभाग ११ च्या नगरसेविका कविता पंजाबी, लाल पंजाबी यांनीही नळांना तोटया बसविल्या. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाचून, परिसरात पाणीसंकट कमी झाल्याचे पंजाबी यांनी सांगितले.
आरोग्याला धोका : सुभाष टेकडी परिसरात दिवसाआड पाणी पुरवठा होण्याऐवजी आठवडयाला दोन दिवस पाणीपुरवठा होतो. तसेच पाणी सोडण्याची वेळ वेळोवेळी बदलत असल्याने महिला त्रस्त झाल्या आहेत. अपुऱ्या पाणी पुरवठयामुळे महिला पिण्यासाठी हातपंपाच्या पाण्याचा उपयोग करीत असल्याने, त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.