लाखोंचे संगणक, स्मार्ट टीव्ही हाय , पण वीजच नाय; लोडशेडिंगमुळे विद्यार्थ्यांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 08:23 PM2022-04-17T20:23:36+5:302022-04-17T20:25:01+5:30
ठाणे : जिल्हा परिषदेच्या एक हजार ३३० शाळांच्या तातडीच्या दुरुस्तीची तसेच विद्युत पुरवठा सुरळीत होण्याची गरज आहे. काही दिवसांपर्यंत ...
ठाणे : जिल्हा परिषदेच्या एक हजार ३३० शाळांच्या तातडीच्या दुरुस्तीची तसेच विद्युत पुरवठा सुरळीत होण्याची गरज आहे. काही दिवसांपर्यंत वीजबिल न भरल्यामुळे जिल्ह्यातील ४७८ शाळांतील वीजपुरवठा खंडित केला होता. ही समस्या सुटते ना सुटते तोच गावपाड्यांतील लोडशेडिंगची समस्या वाढली आहे. त्यामुळे शाळांत असलेले लाखोंचे संगणक, स्मार्ट टीव्ही विजेअभावी विद्यार्थ्यांना वापरता येत नाहीत.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या २४९ शाळांच्या वास्तू धोकादायक, मोडकळीस आल्या हाेत्या. त्यांची अलीकडेच डागडुजी सुरू केली. ग्रामीण भागातील मुलांनी शहरातील विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांत आता स्मार्ट टीव्ही व संगणक आहेत. मात्र, विजेअभावी त्यांचा फारसा वापर होत नसल्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी ज्ञानापासून वंचित आहेत. ठाणे जिल्हा परिषदेच्या मराठी, गुजराथी, हिंदी आणि ऊर्दू भाषिक एक हजार ३३० शाळा आहेत. या शाळांत ७७ हजार ३८३ विद्यार्थी शिक्षण घेतात. २४९ शाळा मोडकळीस आलेल्या आहेत. बहुतांश शाळांनी वीजबिल न भरल्यामुळे त्यांचे वीज कनेक्शन खंडित केले होते. वीजबिल रखडलेल्या ४७८ शाळांचे ४४ लाखांचे बिल भरल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी दिली.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत ग्रामपंचायतींतील शाळांचे वीजबिल सेस फंडातून भरण्याचा निर्णय घेतला. चांगले उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतींना त्यांच्या गावातील शाळांचे वीजबिल भरण्याची जबाबदारी दिली. त्यामुळे सध्या शाळांचे वीजबिल रखडल्याच्या तक्रारी नाहीत; परंतु लोडशेडिंगच्या समस्येमुळे वीजपुरवठा सुरळीत नसल्याने विद्यार्थ्यांना स्मार्ट टीव्ही, संगणक यांचा वापर करता येत नाही.
शाळांच्या वीजबिलाची समस्या मिटली
उत्पन्न चांगले असलेल्या ग्रामपंचायतींनी त्यांच्या गावातील शाळांचे वीजबिल भरण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले. पण बहुतांशी ग्रामपंचायतींचे फारसे उत्पन्न नसल्यामुळे या गावातील शाळांचे वीजबिल सेस निधीतून भरण्याची तरतूद जिल्हा परिषदेने केली. त्यामुळे वीजबिल रखडण्याची समस्या मिटली आहे.
४७८ शाळांचे वीजबिल भरले
वीजबिल भरण्याची समस्या जिल्ह्यातील ४७८ शाळांना भेडसावत होती. येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. जिल्हा परिषदेने सेस निधीतून या शाळांचे ४४ लाखांचे बिल भरल्याचा दावा उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी केला आहे.
जिल्हा परिषदेने स्वत:ची योजना लागू करून शाळांचे वीजबिल भरण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शाळांना आता वीजबिल रखडल्याची समस्या नाही.
- डॉ. भाऊसाहेब कारेकर, शिक्षणाधिकारी
जिल्ह्यातील एकूण शाळा
जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात मराठी भाषिक एक हजार ३०९ शाळा आहेत. याशिवाय गुजराथी व हिंदी भाषिक प्रत्येकी एक शाळा आहे, तर उर्दू भाषिक १९ शाळा आहेत.