उल्हासनगर महापालिकेकडे लाखोंची प्रलंबित बिले; स्मशानभूमी ट्रस्टीला मोफत लाकडे देण्यास निरुत्साह?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:59 PM2021-02-06T17:59:07+5:302021-02-06T17:59:34+5:30
उल्हासनगर महापालिकेने गोरगरीब व गरजू नागरिकांना आपल्या नातेवाईकवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करता यावे म्हणून मोफत लाकडे देण्याचा निर्णय घेतला.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेकडे लाकडाचे बिले गेल्या ४ महिन्यापासून प्रलंबित असल्याने, स्मशानभूमी ट्रस्टी गोरगरीब व गरजू नागरिकांना मोफत लाकडे देण्यास निरुत्साही आहेत. लाकडाचे नियमित पैसे देत नसल्याने, मोफत लाकडे कसे देणार? असा प्रश्न स्मशानभूमी ट्रस्टी मेघराज लुंड यांनी महापालिकेला केला.
उल्हासनगर महापालिकेने गोरगरीब व गरजू नागरिकांना आपल्या नातेवाईकवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करता यावे म्हणून मोफत लाकडे देण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत झाले. सन २०१४ साली एका अंत्यसंस्काराच्या लाकडा पोटी पालिका १ हजार रुपये देते. हा जुनाच दर आजही कायम असून त्यामध्ये वाढ करण्याची मागणी स्मशानभूमी ट्रस्टीने महापालिकेकडे केल्याची माहिती शांतीनगर स्मशानभूमीचे ट्रस्टी मेघराज लुंड यांनी दिली.
एका अंत्यसंस्कार मागे ट्रस्टीला एकूण १७०० ते १८०० रुपये खर्च येतो. तर महापालिका फक्त लाकडाचा १ हजार रुपये खर्च देते. ट्रस्टी मृत नातेवाईकांकडून अगदी अल्प फी आकारत असून पाणी बिल, वीज बिल, माळीचा खर्च, अंत्यसंस्कार करणार्यांचा पगार आदी खर्च ट्रस्टीला करावा लागत असल्याचे ट्रस्टीने म्हणणे आहे.
महापालिकेच्या मोफत लाकडे पुरविण्याच्या निर्णयाचा ७० टक्के नागरिक फायदा घेत आहेत. शहरात ४ प्रमुख हिंदू स्मशानभूमी असून सरासरी दरमहा ३५० ते ४०० मृतदेहावर अंत्यसंस्कार होत असल्याचे लुंड यांनी सांगितले. त्यापैकी ७० टक्के नागरिक मोफत लाकडाचा लाभ घेत आहेत. गेल्या ४ महिन्या पासूनचे मोफत लाकडाचे बिल प्रलंबित असून मोफत लाकडे द्यावी की नाही? असा प्रश्न पडल्याचेही लुंड म्हणाले. २९ जानेवारीला स्मशानभूमी ट्रस्टीने आमदार कुमार आयलानी यांच्या सोबत प्रलंबित बिला बाबत चर्चा केली. तसेच महापालिकेला प्रलंबित बिले काढण्याची मागणी केल्यावर त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे लुंड म्हणाले. याबाबत महापालिकेचे उपायुक्त मदन सोंडे यांच्याकडे संपर्क केला असता, झाला नाही.
ट्रस्टीच्या विरोधात सामान्य नागरिकांत नाराजी
महापालिका नियमित मोफत लाकडाचे बिल गेल्या ४ महिन्या पासून देत नसल्याने, स्मशानभूमी ट्रस्टी गोरगरीब व गरजू नागरिकांना मोफत लाकडे देण्यास निरुत्साह दाखवीत आहेत. याप्रकाराने सर्व सामान्य नागरिकांनी ट्रस्टी विरोधात नाराजी व्यक्त केली. प्रलंबित बिले आज ना उद्या मिळणार असल्याने, ट्रस्टीने मोफत लाकडे देण्याचे बंद करू नये. असे मतही सोशल मीडिया व्यक्त होत आहे.