नोकरीचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा; चौघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 11:59 PM2018-12-09T23:59:47+5:302018-12-10T00:00:02+5:30
न्यायालयीन कोठडीत रवानगी; नामांकित कंपन्यांमध्ये नियुक्तीचे प्रलोभन
- जितेंद्र कालेकर
ठाणे : नामांकित कंपन्यामध्ये सुमारे ५० बेरोजगारांना नोकरीच्या आमिषाने रजिस्ट्रेशन तसेच इतर सुविधांसाठी रिफंडेबल अनामत रक्कम घेऊन १५ ते २० लाखांची फसवणूक करणाऱ्या संतोष (२५रा. आंबेवाडी, वागळे इस्टेट, ठाणे) आणि ज्योती (२४) या दाम्पत्यांसह चौघा भामटयांना कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
पांडे दाम्पत्याने ‘फिनिक्स बिझनेस सोल्यूशन’ नावाने कापूरबावडीतील हायस्ट्रीट मॉलमध्ये कार्यालय थाटले होते. ‘फिनिक्स’द्वारे कोणत्याही कंपनीमध्ये कोणत्याही पदावर शैक्षणिक पात्रतेनुसार नोकºया दिल्या जातात, अशी त्यांनी जाहिरातबाजीही केली. त्यापोटी नावनोंदणी करणाºयाकडून ते प्रत्येकी पाचशे रुपये घेत होते. याव्यतिरिक्त लॅपटॉप, वाहन आणि इतर सुविधेसाठी त्यांच्याकडून जसे ‘सावज’ मिळेल त्याप्रमाणे पाच हजारांपासून ते अगदी दिड लाखांपर्यंतची रक्कमही घेतली जायची. नाव नोंदणीनंतर ६५ दिवसांमध्ये नोकरी मिळेल. नोकरी मिळाल्यानंतर नोंदणीसाठी घेतलेल्या ५०० रुपयांसह इतरही रक्कम परत मिळेल, अशी बतावणी केल्यामुळे कॉर्पोरेट कार्यालयातून पांडेच्या टोळीने मागितलेली रक्कम बेरोजगार तरुणांकडून दिली जात होती. प्रत्यक्षात ६५ दिवसानंतर कोणतीही रक्कम किंवा नोकरीही दिली जात नव्हती. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर कल्याणच्या चिंचपाडा भागातील सिनीजा चराकोलम (४१) यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात २० नोव्हेंबर २०१८ रोजी तक्रार दाखल केली. ‘एचआर अॅडमिन’ या पदावर डोंबिवली येथे नोकरीला लावण्याच्या नावाखाली सिनीजा यांना बनावट आॅफर लेटर दाखवून त्यांच्याकडून २८ हजार ५०० रुपये घेतले. आरुशी नावाने या कार्यालयात मिरविणारी ज्योती पांडे ही कधी ज्योती सिंग असेही नाव सांगायची. तिच्याच नावाने कंपनीचे व्यवहार चालू होते. तिचा पती संतोष हा रोजची जमा झालेली रोकड गोळा करायचा. वरुण गुप्ता उर्फ आदित्य सिंग (३८, रा. मुंब्रा, ठाणे) या बेरोजगारांना हेरण्यासाठी त्यांच्या मुलाखती घेत असे.
हायस्ट्रिट मॉलसारख्या चांगल्या ठिकाणी दीड लाख रुपये अनामत रक्कम देऊन पांडे याच्या टोळीने महिना ३० हजार रुपये भाडयाने घेतलेल्या गाळयामध्ये हे कार्यालय थाटले होते. कल्याणच्या समाधान भोयर (२९) यांच्याकडूनही ६५ हजारांच्या पगाराच्या नोकरीचे अमिष दाखवून ४ आॅक्टोबर २०१८ रोजी ६५ हजार रुपये घेतले होते. लॅपटॉप, ब्लेझर आणि फ्लॅट अशा सुविधाही त्यांना देण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. मुंबईच्या अभ्युदयनगर येथील गुलवार वागळे (४०) यांच्याकडून ८५ हजार रुपये वेतनाच्या वरिष्ठ लेखापाल या पदावरील नोकरीसाठी आधी दहा हजार आणि नंतर ३ आॅक्टोबर रोजी ५२ हजार रुपये घेतले. या भामटयांनी आॅक्टोबरमध्ये कार्यालय बंद केल्याचे आढळल्यानंतर सुमारे ४८ जणांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दाखल केली. यात अनेकांनी आपले दागिने गहाण ठेवून याठिकाणी पैसे भरले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अश्विनी जाधव यांच्या पथकाने वरुण गुप्ता याला २७ नोव्हेंबर २०१८ रोजी अटक केली. त्याला ४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यापाठोपाठ संतोष पांडे आणि आणि शिवशंकर यादव यांना २ डिसेंबर रोजी तर ज्योती पांडे हिला ३ डिसेबर रोजी अटक केली आहे. त्यांनी कार्यालयासाठी भरलेली अनामत रक्कमही जप्त केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गॅल्वानाईजमधूनही फसवणूक
पांडे यांच्या टोळीने याआधी नोकºया देण्याच्या नावाखाली सुशिक्षित बेरोजगारांकडून पैसे उकळण्यासाठी ठाण्याच्या तीन हात नाका येथील इटर्निटी मॉलमध्ये ‘गॅल्वानाईज’ नावाची कंपनी थाटली होती. तिथेही अनेकांची फसवणूक करुन या टोळीने तिथून गाशा गुंडाळला होता, असेही तपासात उघड झाल्याचे कापूबावडी पोलिसांनी सांगितले.