आर्थिक संकटात सापडलेल्या उल्हासनगर पालिकेत कोट्यवधींची कामे मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 01:04 AM2020-01-15T01:04:47+5:302020-01-15T01:04:59+5:30
डम्पिंग ग्राऊंडच्या सपाटीकरणाकरिता साडेतीन कोटी
उल्हासनगर : आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी कोट्यवधी रुपयांच्या कामाच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा सपाटीकरणावर वर्षाला तब्बल साडेतीन कोटी खर्च येणार असून जलवाहिन्यांचे व्हॉल्व बदलण्यावर ८६ लाख खर्च केले जाणार आहेत. ३० लाखांच्या निधीतून हातपंपाची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील मालमत्ता कराची वसुली एकूण अपेक्षित उत्पन्नाच्या जेमतेम १० टक्के झाल्याने महापालिका आर्थिक संकटात सापडल्याची ओरड होत आहे. त्याचवेळी सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कोट्यवधी रुपयांच्या प्रस्तावाला एकमताने मान्यता देण्यात आली. पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना गळती लागल्याने त्यांचे व्हॉल्व बदलण्यावर तब्बल ८६ लाख रूपये खर्च करण्यात येणार आहेत. पाणीटंचाईचे संभाव्य संकट लक्षात घेऊन बंद पडलेले हातपंप दुरुस्तीवर ३० लाखाच्या खर्चाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. तसेच डम्पिंगवरील कचºयाचे सपाटीकरण करण्यावर वर्षाला तब्बल साडेतीन कोटी खर्च येणार आहे. डेंग्यू, हिवताप आदी रोगाला प्रतिबंध करण्यासाठी फॉगींग मशिनद्वारे फवारणी करणे व औषध पुरवठ्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.
रूंदीकरण झालेल्या पण गेल्या ४ वर्षापासून ठप्प झालेल्या कल्याण ते बदलापूर रस्त्याच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. रस्त्याच्या खालील जलवाहिनीची जोडणी व जलवाहिन्या एका बाजुला करण्याच्या ठेक्याला मंजुरी देण्यात आली असून त्यावर तब्बल साडेतीन कोटींचा खर्च येणार आहे. तसेच शांतीनगर व वडोलगाव येथील मलनि:सारण केंद्र येत्या दोन महिन्यात कार्यान्वित होणार असून कुशल व अकुशल कर्मचारी पुरविण्याच्या ठेक्याला मान्यता देण्यात आली.
आज पुन्हा बैठक
टंचाईग्रस्त भागात टँकरने पाणीपुरवठा करणे, १०० पेक्षा जास्त अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करणे, भाड्याच्या मालमत्तेची फेर कर आकारणी करून त्यामध्ये सुधारणा करणे आदी प्रस्ताव पुढे ढकलले. उद्याच्या बैठकीत हे विषय घेण्यात येणार आहे.