सातारा घटनेच्या निषेधार्थ भिवंडीत एमआयएमचे आंदोलन
By नितीन पंडित | Published: October 10, 2023 06:02 PM2023-10-10T18:02:26+5:302023-10-10T18:02:35+5:30
१० सप्टेंबर रोजी एका गटाने सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथील जामा मशिदीवर प्राणघातक हल्ला केला होता.
भिवंडी : १० सप्टेंबर रोजी एका गटाने सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथील जामा मशिदीवर प्राणघातक हल्ला केला होता. त्या वेळी मशिदीत नमाज अदा करणारे नुरुल हसन लियाकत शिकलकारी हे मयत झाले होते तर अन्य १३ जण जखमी झाले होते. तसेच हल्लेखोरांनी मशिदीत ठेवलेले कुराण आणि अनेक पवित्र ग्रंथ तसेच सार्वजनिक साहित्य जाळले होते.या घटनेचा निषेध नोंदवत बळी पडलेल्या नुरुल हसन लियाकत शिकलकारी आणि इतर जखमींना न्याय मिळावा व नुकसान भरपाई देण्यासाठी एमआयएम पक्षाचे भिवंडी शहर कार्याध्यक्ष शादाब उस्मानी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निषेध नोंदवला.त्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन प्रांत कार्यालयात सादर केले.
या घटनेची राज्य शासनाने सखोल चौकशी करावी या घटनेस जबाबदार असलेल्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा. या घटनेस जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.या घटनेत मयत व जखमींना शासकीय मदत लवकरात लवकर द्यावी. या व अशा अनेक मागण्यांचे लेखी निवेदन शहर कार्याध्यक्ष शादाब उस्मानी यांनी प्रांताधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द केले.