एमआयएमची लढत आघाडीशीच!
By admin | Published: October 27, 2015 12:15 AM2015-10-27T00:15:40+5:302015-10-27T00:15:40+5:30
राज्यात दोन आमदार आणि औरंगाबाद महापालिकेत मिळालेल्या यशानंतर आॅल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलीमीन (एमआयएम) ही केडीएमसी निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे
प्रशांत माने, कल्याण
राज्यात दोन आमदार आणि औरंगाबाद महापालिकेत मिळालेल्या यशानंतर आॅल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलीमीन (एमआयएम) ही केडीएमसी निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे. त्यांनी कल्याण पश्चिम आणि पूर्वेकडील मुस्लिमबहुल प्रभागात आपले उमेदवार उभे केले आहेत. साधारणत: पारंपरिक मुस्लिम मतदान हे काँग्रेस तसेच राष्ट्रवादीला होत असल्याचा अनुभव असताना यंदा मात्र हे चित्र पालटण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर एमआयएम आणि आघाडीच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता पाहता होणाऱ्या मतविभाजनाचा लाभ कोणाला, हे पाहणेदेखील औत्सुक्याचे आहे.
कल्याणमध्ये पावणेदोन ते दोन लाखांच्या आसपास मुस्लिम समाज आहे. येथील दूधनाका, रेतीबंदर, गांधी चौक, आनंदवाडी, बैलबाजार, सिंधीगेट, अशोकनगर, नेतिवली टेकडी, आंबेडकर रोड, मच्छी बाजार, बोंबिल बाजार, घासबाजार, वल्लीपीर रोड, गोविंदवाडी, कोळीवाडा, कचोरे, अन्सारी चौक या परिसरात मुस्लिम मतदारांची संख्या अधिक आहे. दरम्यान, पहिल्यांदाच केडीएमसीची निवडणूक लढविणाऱ्या एमआयएमने गोविंदवाडी, रोहिदासवाडा, गफुरडोन चौक, कचोरे, नेतिवली टेकडी, अशोकनगर वालधुनी आणि बैलबाजार अशा सात ठिकाणी आपले उमेदवार दिले आहेत. सहा ठिकाणी मुस्लिम उमेदवार दिले असताना अशोकनगर वालधुनी प्रभागात अन्य समाजाच्या उमेदवाराला प्राधान्य दिले आहे. गतवेळचा आढावा घेता मुस्लिमबहुल प्रभागात उभ्या राहिलेल्या उमेदवारांपैकी काँग्रेस-राष्ट्रवादी तसेच अपक्षांना मुस्लिम मतदारांनी पसंती दिली होती. यंदा एमआयएम रिंगणात उतरली आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी करून लढत आहे. अन्य पक्षांचे उमेदवार जरी आखाड्यात असले तरी थेट लढत एमआयएम आणि आघाडीत होणार आहे. मुस्लिम पारंपरिक आघाडीला साथ करतात की एमआयएमचा पर्याय स्वीकारतात, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.