दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे! जयंत पाटील यांच्या निलंबनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, ठाण्यात जोरदार निदर्शने
By अजित मांडके | Published: December 22, 2022 06:28 PM2022-12-22T18:28:06+5:302022-12-22T18:28:54+5:30
Thane News: राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्याकडून "दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे, ही नवीन घोषणा देण्यात आली.
- अजित मांडके
ठाणे - मुख्यमंत्र्यांनी केलेला जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश होऊ नये, यासाठी पटलावर नसलेले विषय सभागृहात आणून निर्वाचित लोकप्रतिनिधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधारी करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्याकडून "दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे, ही नवीन घोषणा देण्यात आली.
विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्यामुळे जयंत पाटील आक्रमक झाले होते. पण यावेळी बोलत असताना त्यांनी विधानसभा अध्यक्षांना असंसदीय शब्द वापरला. त्यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला आणि जयंत पाटलांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. यानंतर जयंत पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्यांचं निलंबन करण्यात आले. त्य निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी "तख्त बदल दो, ताज बदल दो ; गद्दारो का राज बदल दो, निर्लज्ज सरकारचा निषेध असो, ईडी सरकार मुर्दाबाद, पन्नास खोके -एकदम ओके, लोकशाहीचा गळा घोटणार्या सरकारचा निषेध असो" अशा घोषणा देत जोरदार निदर्शने केली. यावेळेस कार्यकर्त्यांकडून चक्क खोके आणले होते.
या प्रसंगी आनंद परांजपे यांनी, हे सरकार आपल्या बहुमताचा गैरवापर करीत आहे. महापुरूषांवरील अश्लाघ्य टीकेला आणि त्यांच्या बदनामीला हे सरकार सहज घेत आहे. महापुरूषांची बदनामी होत असताना हे सरकार शांत होते. मात्र, आता जो विषय पटलावर नाही; त्या विषयावर चर्चा घडवून मुख्यमंत्र्यांनी केलेला भ्रष्टाचार दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संदर्भात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र आमचे नेते डाॅ.जितेंद्र आव्हाड हे सभागृहात मांडणार होते. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांनी 14 वेळा सभागृह बंद पाडले. सत्ताधारी पक्षातील 14 सदस्य सभागृहात बाजू मांडत असताना विरोधकांच्या एकाही सदस्याला बाजू मांडण्याची संधी दिली जात नाही. त्या विरोधात माईक बंद असताना केलेले भाष्य इतिवृत्तात आणून जयंत पाटील यांचे निलंबन केले जात असेल तर ही हुकूमशाहीची नांदी आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचा हा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही; त्या विरोधात आम्ही संघर्ष करू, असा इशारा दिला.