मुंबईच्या नाल्यांची घाण मीरा-भार्इंदरमध्ये
By admin | Published: May 6, 2016 12:57 AM2016-05-06T00:57:23+5:302016-05-06T00:57:23+5:30
मुंबईतील नालेसफाई सुरु झाली आहे. काढलेला गाळ मिरा-भार्इंदरमधील घोडबंदर, वसई-विरारमधील ससूनवघर व मालजीपाडा परिसरातील तिवर व पाणथळ क्षेत्रात टाकली जात आहे.
भार्इंदर : मुंबईतील नालेसफाई सुरु झाली आहे. काढलेला गाळ मिरा-भार्इंदरमधील घोडबंदर, वसई-विरारमधील ससूनवघर व मालजीपाडा परिसरातील तिवर व पाणथळ क्षेत्रात टाकली जात आहे. ही घाण वाहून आणणारे डंपर घोडबंदर गावातील रस्त्यावरच उभे केले जात असल्याने तेथे वाहतूक कोंडी होते. डंपरमधील घाणीच्या दुर्गंधीमुळे घोडबंदरकर त्रस्त झाले आहेत.
मिरा-भार्इंदरमधील तिवरसह पाणथळ क्षेत्रात मुंबईतील बांधकामाचे साहित्य (डेब्रिस) मोठ्या प्रमाणात टाकला जात असला तरी महसूल विभाग, पालिका प्रशासन व पोलिस कोणतीही कारवाई करत नाहीत. यामुळे या क्षेत्रात खुलेआम मातीचा भराव टाकून अनेक ठिकाणी बेकायदा बांधकामेही केली आहेत. यावर कारवाईचे आदेश आल्यानंतरच त्या बांधकामांवर थातूरमातूर कारवाई केली जाते. शहरातील बुहतांश तिवरक्षेत्र घोडबंदर व वसई-विरारमधील ससूनवघर, मालजीपाडा परिसरात असल्याने तेथे मातीचा भराव टाकला जातो. यावर महसूल विभाग केवळ कागदी घोडे नाचवून कारवाईचे सोपस्कार पार पाडतात.
डेब्रिजनंतर मुंबईत सध्या सुरु झालेल्या नालेसफाईची घाण घोडबंदरसह ससूनवघर व मालजीपाडा परिसरातील तिवर व पाणथळ क्षेत्रात टाकली जात आहे. त्यासाठी दिवसभर घाण वाहून आणणारे डंपर घोडबंदर गावातील रस्त्यावरच उभे केले जातात. त्यामुळे येथील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन दुर्गंधी परिसरात पसरत आहे. यामुळे तेथील रहिवाशी दुर्गंधीमुळे त्रस्त झाले असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे दोन्ही पालिका प्रशासन व जिल्हा प्रशासन डोळेझाक करीत आहेत. पर्यावरण विभाग तिवरक्षेत्रातील लोकाभिमुख विकासाला मनाई करते. परंतु, याच क्षेत्रातील बेकायदा प्रकार नजरेआड करीत असल्याचा आरोप घोडबंदरकरांनी केला आहे. मुंबईतील घाण आमच्या हद्दीत नको, तेथील जागेत होणारा भराव त्वरित थांबवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.(प्रतिनिधी)
चौकशी केली जाईल : प्रभाग अधिकारी वासुदेव शिरवळकर म्हणाले, डंपरमुळे वाहतूक कोंडी झाल्याने ती वाहतूक शाखेच्या मदतीने सुरळीत करण्यात आली. त्या डंपरमधील घाण मीरा-भार्इंदर हद्दीत टाकली जात नाही. तरीदेखील त्याची चौकशी केली जाईल.