सुदृढ आरोग्यासाठी किमान सात तास झोप आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:43 AM2021-08-27T04:43:13+5:302021-08-27T04:43:13+5:30
स्टार ११०० अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : आपण झोप किती घेतो, यावर आपले आरोग्य तसेच रोगप्रतिकारक शक्ती ...
स्टार ११००
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : आपण झोप किती घेतो, यावर आपले आरोग्य तसेच रोगप्रतिकारक शक्ती अवलंबून असते. त्यामुळे कमी झोपेमुळे रोग प्रतिकारशक्तीही खालावते. शरीर सुदृढ राहण्यासाठी किमान सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे. मात्र, ज्यांचे वय १८ ते ६० दरम्यान आहे, त्यांना त्यापेक्षा जास्त झोपेचीही गरज नाही. पण ज्यांची झोप पूर्ण होणार नाही, त्यांना भविष्यात खूप आजार-विकारांना सामोरे जावे लागू शकते, अशी धोक्याची सूचना मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विजय चिंचोले यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून सर्वच जण आरोग्याबाबत अधिक सजग झाले आहेत. स्वत:ची तसेच घरातील, कार्यालयांतील, आपल्या परिसरातील स्वच्छतेलाही अधिक महत्त्व आले आहे. मात्र, या काळात वर्क फ्रॉम होमचा प्रकार वाढला आहे. त्यात कार्यालयांतील वेळेपेक्षा अधिक काम नोकरदार करू लागले आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचा वाढता ताणही अनेकांना असहाय्य झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुरेशी झोप आवश्यक असल्याचे डॉ. चिंचोले म्हणाले. लहान मुलांनी म्हणजे शिशु मुलांनी १२ तास, त्यापेक्षा थोड्या मोठ्यांनी १० तास, कुमार मुलांनी आठ ते १० तास आणि त्यापुढे १८ ते ६० पर्यंतच्या वयोगटांतील नागरिक, ज्येष्ठ नागरिकांनाही सात ते आठ तासांची झोप गरजेची असल्याचे चिंचोले म्हणाले.
-----------
अपुऱ्या झोपेचे तोटे
- मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार होऊ शकतात.
- अस्थिरता, चंचलता वाढण्याची भीती.
- एकाग्रता कमी होऊ शकते.
-----------------------
रोगप्रतिकारकशक्ती आपल्या शरीराची ढाल
कोरोनाकाळात रोगप्रतिकारक शक्तीची सगळ्यांना जाणीव झाली. ज्यांची प्रतिकार शक्ती कमी त्यांना आजाराचा संसर्ग लवकर होतो. त्यामुळे आहार, विहार, निद्रा ही आरोग्याची त्रिसूत्री पाळायला हवी. जे पाळतील त्यांना उत्तम आरोग्य लाभेल असे तज्ज्ञ सांगतात.
---------------
व्यायामही आवश्यक
योग्य झोपेसाठी संतुलित आहार आणि व्यायामही आवश्यक आहेच. परंतु झोपण्याआधी दोन तास मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही पाहाणे टाळावे. शक्यतोवर सूर्यास्तानंतर उत्तेजक पेय टाळावीत. यासह योग, आहारावर नियंत्रण, वेळेचे नियोजन आदी मुद्दे लक्षात घ्यायला हवेत.
---------------
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी झोपेची खूप गरज आहे. त्यासाठी झोपेचे नियोजन करणे गरजेचे आहे. शक्यतोवर ठराविक वेळेला झोपायला अंथरुणावर जायला हवे, पण तसे अलीकडे होत नाही. त्यामुळे झोप, आहार आणि विहार या सगळ्या मुख्य आरोग्य त्रिसूत्रीची सांगड बदलली असल्याने गुंतागुंत वाढल्याने अनेकांना निद्रानाश विकार जडतात. ते टाळायला हवे.
- डॉ. विजय चिंचोले, मानसोपचार तज्ज्ञ
---------------