'पळपुटेपणा केला नाही'; देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 06:36 PM2021-12-12T18:36:48+5:302021-12-12T18:40:02+5:30
गोपनियतेचा भंग झाल्याने यापुढे त्रयस्थ यंत्रणोऐवजी म्हाडाच घेणार परीक्षा
ठाणे: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध पदांवरील परीक्षेचा पेपर फूटीच्या आधीच तो रद्द केला आहे. परंतु, यापुढे असे गैरव्यवहार टाळण्यासाठी त्रयस्थ यंत्रणेऐवजी म्हाडातर्फेच विविध पदांवरील उमेदवारांच्या भरतीचे पेपर तयार करुन ते घेण्यात येतील. शिवाय, आताचे शुल्कही परत केले जाणार असून पुन्हा परीक्षेचे शुल्कही घेतले जाणार नाही, अशी महत्वपूर्ण घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी ठाण्यात केली.
ठाण्यातील आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ऐनवेळी परीक्षा रद्द करावी लागल्यामुळे परीक्षार्थीना जो मन:स्ताप झाला त्याबद्दल त्यांनी माफीही मागितली. शनिवारी म्हाडाचे अधिकारी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील पेपरफुटीसाठी जे प्रयत्नशील होते, यामध्ये तिघे पकडले गेले. त्यातील दोघेजण हे आरोग्य विभागाच्या पेपर फूटीमध्येही सहभागी असल्याचा संशय असल्याचे ते म्हणाले.
गृहनिर्माण विभागाच्या भरतीची परीक्षा घेण्याचे काम असलेल्या कंपनीच्या मालकालाही यात पकडले आहे. ज्यांनी मेहनत घेऊन परीक्षेची तयारी केली होती. त्यांना या कारवाईमुळे खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. अशा प्रकारचा पेपर फोडण्याआधीच ही टोळी उद्ध्वस्त करणा:या पुणे पोलिसांचेही आव्हाड यांनी विशेष अभिनंदन केले. हे पेपर एकाच व्यक्तीला माहित होते, तीच व्यक्ती अशा पेपर फूटीसाठी योजना आखीत असेल तर विश्वास कोणावर ठेवायचा, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
एकदा पेपर छपाईसाठी गेल्यानंतर तो तुमच्या हातात असता कामा नये, त्यामुळेच गोपनियतेचा भंग केल्याच्या कायद्याखाली ही कारवाई संबंधितांवर केल्याचे ते म्हणाले. यापुढे असे गैरप्रकार कसे रोखता येईल, यासाठीही विशेष लक्ष देण्यात येईल. आरोग्य किंवा गृहनिर्माण अशा सर्वच परीक्षांचे दलालही एकाच टोळीतील आहेत. ते कोणत्याही सरकारच्या वेळी कार्यरत असतात.
ग्रामीण भागातील परीक्षार्थीनीही या संभाव्य पेपर फुटीच्या तक्रारी केल्यामुळेच आपणही परीक्षार्थी तसेच दलालांनाही असे गैरप्रकार करण्यापासून याआधीच सातत्याने आवाहन केले होते, असेही आव्हाड यावेळी म्हणाले. त्यामुळेच पेपर फूटीची कुणकुण लागताच हा पेपर विद्याथ्र्याच्या हितासाठी आपण रद्द केल्याचेही ते म्हणाले. असे गैरव्यवहार रोखण्यासाठी यापुढे म्हाडा पेपर तयार करुन या परीक्षा घेतील, असे ते म्हणाले.
पळपुटेपणा केला नाही- आव्हाड
पेपर फुटीच्या प्रकरणामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. याच टीकेला उत्तर देतांना आव्हाड म्हणाले, सरकार आहे, म्हणूनच पेपर फूटीतील आरोपी पकडले गेले. विद्यार्थ्यांना सूचक इशाराही दिला. कुठेही पळपुटे केला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.