फेरीवाल्यांविरोधात राज्यमंत्री रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 03:21 AM2018-08-30T03:21:46+5:302018-08-30T03:22:17+5:30

बाहेरून आलेल्यांंची दादागिरी : १८ जणांना अटक, ७०-८० जणांवर होणार कारवाई

Minister of State against the hawkers on the road | फेरीवाल्यांविरोधात राज्यमंत्री रस्त्यावर

फेरीवाल्यांविरोधात राज्यमंत्री रस्त्यावर

Next

डोंबिवली : पूर्वेला रेल्वेस्थानकापासून १५० मीटरच्या परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास केडीएमसीने मज्जाव केला असून त्यांच्याविरोधात कारवाई सुरूच आहे. तरीही, काही फेरीवाल्यांनी बुधवारी फडके रोडवर बसण्याचा प्रयत्न केला. त्यास स्थानिकांनी विरोध केला असता, ‘तुम सौ लाओगे, तो हम पाचसो लाऐंगे’ अशी दादागिरीची भाषा करत काही व्यापाऱ्यांना त्यांनी धक्काबुक्की केली. ही बाब राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना कळताच त्यांनी घटनास्थळी रस्त्यावर उतरून कल्याण, मुंब्य्रासह इतर भागांतून आलेल्या फेरीवाल्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ७० ते ८० जणांवर कारवाई होणार आहे. तर, १८ जणांना अटक करण्यात आली.

स्थानिक आणि ज्यांची फेरीवाला म्हणून महापालिकेकडे नोंद आहे, त्यांच्याव्यतिरिक्त इतर फेरीवाल्यांना पूर्वेला स्थानकाच्या १५० मीटर परिसरात महापालिकेने मज्जाव केला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाºया फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना रवींद्र चव्हाण यांनी प्रभागक्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांच्यासह रामनगर पोलिसांना दिल्या होत्या. या मुद्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात तातडीची बैठक घेतली होती. महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी गेल्या आठवड्यात फेरीवाल्यांची बैठक घेतली होती. या मुद्यावर लवकरच तोडगा काढून स्थानक परिसर मोकळा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, काही फेरीवाले महापालिकेच्या पथकाला विरोध करत असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले होते. तरीही, काही फेरीवाले या परिसरात येऊन दादागिरी करत असल्याच्या तक्रारी काही व्यापारी, नागरिक व वाहनचालकांनी चव्हाण यांच्याकडे केल्या. त्यानुसार, वस्तुस्थिती बघण्यासाठी चव्हाण तेथे गेले असता फेरीवाल्यांच्या उद्धट वर्तनामुळे ते संतापले. त्यांनी फेरीवाल्यांविरोधात तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, कुमावत यांनी संबंधितांची तक्रार दिली. त्यानुसार १८ जणांना अटक करण्यात आली.

चव्हाण समर्थकांसह व्यापारी व दादागिरी करणाºया फेरीवाल्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे फडके रोडसह डॉ. राथ रोड, उर्सेकरवाडी, पाटकर रोड आदी परिसरांत काही काळ तणावपूर्ण वातावरण झाले होते. चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसह नगरसेवकांना शांत राहण्याचे आदेश दिले. ज्यांची महापालिका दफ्तरी नोंद आहे, त्यांना विरोध नाही; मात्र जे बाहेरून येऊन दादागिरी करताहेत, त्यांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी नगरसेवक राजन आभाळे, संदीप पुराणिक, विश्वदीप पवार, खुशबू चौधरी, विशू पेडणेकर, फ प्रभाग समिती सभापती साई शेलार यांच्यासह भाजपाचे जिल्हा चिटणीस नंदू जोशींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. एसीपी वाडेकर यांनी जमावाला शांत राहण्याचे आदेश देऊन याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. फडके रोड, नेहरू रोड, डॉ. राथ रोड, पाटकर रोडसह ठिकठिकाणच्या व्यापाºयांनी राज्यमंत्री चव्हाण यांचे आभार मानले. दादागिरी करणाºया फेरीवाल्यांचा आम्हीही विरोध करू, असे त्यांनी स्पष्ट केले. फडके रोडवरील रहिवासीही रामनगर पोलीस ठाण्यात आले होते. त्यांनीही चव्हाण यांच्या भूमिकेचे समर्थन केले. हॉटेल बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशनचे शेलैश कित्ता, अजित कित्ता, प्रभाकर शेट्टी, ज्वेलर्स असोसिएशनचे व्यापारी, मोबाइल व इलेक्ट्रॉनिक विक्रेते व्यापारी यांच्यासह इतर व्यापारी त्यावेळी उपस्थित होते.

फेरीवाल्यांसंदर्भात आमचे नियोजन कुचकामी ठरले. बाहेरचे फेरीवाले आले होते. त्यांनी उद्धट वर्तन केल्याचे ऐकीवात आले असून त्यामुळे हा घोळ झाला असावा. राज्यमंत्र्यांची भूमिका त्यांच्यादृष्टीने योग्य होती. आम्ही स्थानक परिसर मोकळा ठेवणार असून आम्हाला आता महापालिकेने योग्य जागा द्यावी. आयुक्तांनी आॅगस्टअखेरीस निर्णय घेणार असल्याचे म्हटले असून ते लवकरच भूमिका स्पष्ट करतील, अशी आम्हाला आशा आहे. उद्धट वर्तन करणाºयांचा आम्ही निषेध करतो.
- प्रशांत सरखोत, सल्लागार, कष्टकरी हॉकर्स फेरीवाला संघटना

Web Title: Minister of State against the hawkers on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.