उल्हासनगरातील जीन्स कारखानदारांना राज्यमंत्र्यांचा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 04:54 PM2017-12-05T16:54:37+5:302017-12-05T16:55:29+5:30
उल्हासनगर : जीन्स कारखानदारांची चालिया हॉल येथे बैठक घेऊन १५ दिवसांत तोडगा काढण्याचा दिलासा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला.
उल्हासनगर : जीन्स कारखानदारांची चालिया हॉल येथे बैठक घेऊन १५ दिवसांत तोडगा काढण्याचा दिलासा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला. तर नोव्हेंबरमध्ये शिवसेनेने जीन्स कारखानदारांची बैठक घेऊन दिलासा देण्याचे आश्वासन दिले. तोच कित्ता भाजपाने गिरवून शिवसेनेवर कुरघोडी केलीे.
शहरातील वालधुनी नदीला प्रदूषित केल्याचा ठपका सामाजिक संघटनेसह न्यायालयाने जीन्स कारखान्यावर ठेवला. सर्वाच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महापालिका व वीज मंडळाने कारखान्यांचे वीज व पाणीपुरवठा खंडित केला आहे. कारखाने गेल्या एका महिन्यांपासून बंद झाले असून हजारो कामगार बेकार होऊन त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले. जीन्स वॉश कारखाने बंद झाल्यावर, वालधुनी नदी स्वच्छ झाली का? असा प्रश्न जीन्स कारखानदारांनी केला आहे. कारखाने बंद असल्याने परिसरात अवकळा आली असून कारखानदार शिवसेना-भाजपच्या नेत्यांचे घराचे उंबरठे झिजवित असल्याचे चित्र आहे.
गेल्या महिन्यात आमदार बालाजी किणीकर, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, जीन्स वॉश कारखाना संघटनेचे अध्यक्ष परशुराम पाटील यांच्या पुढाकाराने जीन्स वॉश कारखान्याची बैठक खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतली होती. खासदार श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर यांच्या मागणीनुसार पर्यावरण मंत्री रामदास कदम, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेटमंत्र्यांना बैठकीत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडे साकडे घातले होते. मुख्यमंत्र्यानी मुख्य सचिवांना स्थानिक जिल्हाधिकारी यांच्यासह प्रदूषण मंडळ, एमआयडीसी आदीची बैठक घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून, सर्वांचे लक्ष निर्णयाकडे लागले आहे.