मौजमजेसाठी मोटारसायकलींची चोरी करणारा अल्पवयीन मुलगा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 08:55 PM2019-02-21T20:55:58+5:302019-02-21T21:13:46+5:30
कळव्याच्या शिवाजीनगरातील एका अल्पवयीन चोरट्याला कळवा पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून मुंबई, ठाण्यातून चोरलेल्या एका रिक्षासह नऊ वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. त्याच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ठाणे : मौजमजेसाठी मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या कळव्याच्या शिवाजीनगरातील एका अल्पवयीन चोरट्याला कळवा पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून मुंबई, ठाण्यातून चोरलेल्या एका रिक्षासह नऊ वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. त्याची भिवंडीच्या बालनिरीक्षणगृहात रवानगी केली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये मालमत्तेच्या आणि वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये ठाणे शहर आणि कळवा भागात वाढ झाल्याचे निदर्शनास आल्याने ते उघड करण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी गुन्हे आढावा बैठकीतून अधिकाºयांना दिले होते. याच पार्श्वभूमीवर परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी, कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा पोलिसांकडून नाकाबंदी तसेच गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या पथकाने नियोजन केले होते. नियमित नाकाबंदीमध्ये पोलीस निरीक्षक सचिन गावडे यांनी एका संशयित मोटारसायकलस्वारास थांबवून त्याच्याकडे वाहनाच्या कागदपत्रांची विचारपूस केली. त्याने समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्याला मोटारसायकलीसह ताब्यात घेतले. तेव्हा, त्याने कळवा आणि मुलुंड परिसरांत अनेक वाहनचोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. यात कळव्यातून तीन, मुंबईतील पाच मोटारसायकली आणि एक रिक्षा अशा वाहनांची चोरी केल्याचे उघड झाले. त्याला बालन्यायमंडळाच्या आदेशानुसार भिवंडीतील बालनिरीक्षणगृहामध्ये जमा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मौजमजा करण्यासाठी तो या वाहनांची चोरी करत असल्याचेही तपासात समोर आले आहे. त्याच्या आणखीही साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.