अंबरनाथमधून बेपत्ता झालेला अल्पवयीन मुलगा सहा वर्षांनी अहमदनगरमध्ये मिळाला
By जितेंद्र कालेकर | Published: December 19, 2020 12:33 AM2020-12-19T00:33:20+5:302020-12-19T00:37:44+5:30
अंबरनाथ येथील घरातून निघून गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा अहमदनगर येथून शोध घेण्यात ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाला यश आले आहे. आपला मुलगा सुखरुप मिळाल्याने त्याच्या पालकांनी ठाणे पोलिसांचे आभार मानले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: वडिल रागावल्यामुळे अंबरनाथ येथील घरातून निघून गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा अहमदनगर येथून शोध घेण्यात ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाला यश आले आहे. त्याला शुक्रवारी सुखरुपपणे पालकांच्या स्वाधीन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संजयकुमार विश्वकर्मा या १७ वर्षीय मुलाच्या अपहरणाची तक्रार २०१४ मध्ये अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. याप्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे २०१७ मध्ये सोपविण्यात आला होता. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग, उपनिरीक्षक सुनिल चव्हाणके आणि पोलीस हवालदार प्रविण दिवाळे यांनी अथक मेहनत घेऊन तांत्रिक माहितीद्वारे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा तो अहमदनगर जिल्हयातील कर्जत येथील थोटेवाडी येथे मजूरीचे काम करीत असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्याच माहितीच्या आधारे चव्हाणके यांच्या पथकाने अहमदनगर येथून १६ डिसेंबर २०२० रोजी त्याला ताब्यात घेतले. त्याची व्हिडिओ कॉलिंगद्वारे उत्तरप्रदेशात कामानिमित्त गेलेल्या त्याच्या वडिलांशी या पथकाने ओळख पटवून खात्री केली. तो आपलाच मुलगा असल्याचे त्याच्या वडिलांनी या पथकाला सांगितले. क्षुल्लक कारणावरुन रागावल्याने त्याने घर सोडल्याची माहिती त्याच्या चौकशीमध्ये समोर आली. थोटेवाडी येथे त्याच्या वर्णनाशी मिळता जुळता एक मुलगा असल्याची माहिती मिळाल्यानंतर या पथकाने त्याचा शोध घेतला.
* आवाज बारीक असल्यामुळे गोंधळ
संजयकुमार याचा आवाज त्याच्या वयाच्या मानाने कमी होता. त्यामुळे त्याच्या फोनवरील आवाजातून तो नसावा, अशी शक्यता होती. परंतू, प्रत्यक्षात थोटेवाडी गाठल्यानंतर मात्र तो संजयकुमार असल्याची खात्री पटल्याचे कडलग यांनी सांगितले. आपला मुलगा सुखरुप मिळाल्याने त्याच्या पालकांनी ठाणे पोलिसांचे आभार मानले.