केवळ मौजमजेसाठी स्कूटर चोरणारा निघाला अल्पवयीन मुलगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 09:06 PM2021-03-01T21:06:18+5:302021-03-01T21:08:00+5:30
केवळ मौजमजेसाठी दुचाकींची चोरी करणाऱ्या एका अल्पवयीन चोरटयाला वर्तकनगर पोलिसांनी मोठया कौशल्याने ताब्यात घेतले आहे. त्याला भिवंडी न्यायालयाने १५ दिवस भिवंडी येथील बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: केवळ मौजमजेसाठी दुचाकींची चोरी करणाऱ्या एका अल्पवयीन चोरटयाला वर्तकनगर पोलिसांनी मोठया कौशल्याने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून आठ मोटारसायकली आणि दोन मोबाईल जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी सोमवारी दिली.
वर्तकनगर भागात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हणमंत क्षिरसागर, जमादार एस. के. यादव आणि महिला पोलीस नाईक अरुणा वामन आदींच्या पथकाने बदलापूर स्कायवॉक येथे २८ फेब्रुवारी २०२१ रोजी या अल्पवयीन चोरटयाला ताब्यात घेतले. तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी त्याचा पाठपुरावा केला होता. एखादी स्कूटर चोरल्यानंतर तो तीन ते चार दिवस फिरवायचा. त्यानंतर ती दुचाकी कुठेही सोडून तो पसार होत होता. त्याच्याकडून वर्तकनगर येथील दोन, विष्णुनगर, नारपोली, राबोडी, बदलापूर, ठाणेनगर आणि मानपाडा येथील प्रत्येकी एक मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड झाला असून वर्तकनगर येथील दोन मोबाईल चोरीचेही गुन्हे उघड झाले आहेत. त्याला भिवंडी न्यायालयाने १५ दिवस भिवंडी येथील बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.