उपनगरीय रेल्वे कोचला किरकोळ आग; रेल्वे सेवा १५ मिनिटे विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 08:48 PM2022-04-10T20:48:58+5:302022-04-10T20:49:18+5:30
ठाणे रेल्वे स्थानकातील घटना; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली
ठाणे: ठाणेरेल्वे स्थानकात रविवारी दुपारी टिटवाळा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (सीएसएमटी) जाणाऱ्या उपनगरी रेल्वेच्या मागील मोटर कोचमधील ब्रेक सिस्टीममध्ये किरकोळ आग लागली होती. रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत ही आग त्वरित विझवली. या घटनेमुळे रेल्वे सेवा १५ मिनिटे विस्कळीत झाली होती.
रविवारी दुपारी १२.३० वाजता ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक सहावर टिटवाळा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद उपनगरी गाडी उभी होती. त्याचवेळी या गाडीच्या मागील मोटर कोचमधील ब्रेक सिस्टीममध्ये किरकोळ आग लागली. या घटनेची माहिती मिळताच ठाणे रेल्वे पोलीस कर्मचारी तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांनी अग्निरोधक यंत्रणेच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली. दरम्यान, या घटनेमुळे सुमारे १५ मिनिटे रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. आग पूर्णपणे विझविल्यानंतर रेल्वे सेवा पूर्ववत झाल्याची माहिती मध्य रेल्वेच्या नियंत्रण कक्षातून देण्यात आली.