लग्नाचे अमिष दाखवून गुजरातमधून तरुणीचे अपहरण: ठाणे पोलिसांनी केली सुखरुप सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 05:57 PM2018-10-10T17:57:09+5:302018-10-10T18:18:06+5:30
गुजरातच्या वापी येथील मालीवाड भागातील एका अल्पवयीन तरुणीला पळवून आणणाऱ्या हुजेफा गाडीवाला (१९, रा. मालीवाड, गुजरात) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने गुजरात पोलिसांच्या संयुक्त कारवाईतून गोवा येथून मंगळवारी अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: लग्नाचे अमिष दाखवून गुजरातच्या वापी येथील मालीवाड भागातील एका अल्पवयीन तरुणीला पळवून आणणा-या हुजेफा गाडीवाला (१९, रा. मालीवाड, गुजरात) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने गुजरात पोलिसांच्या संयुक्त कारवाईतून गोवा येथून मंगळवारी अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिली. त्याच्या ताब्यातून या मुलीची सुटकाही करण्यात आली आहे. या अपहरण नाटयामुळे गुजरातमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, असेही त्यांनी सांगितले.
गुजरातमधील वापी जिल्हयातील मालीवाड येथील एका अल्पवयीन मुलीला पळवून आणल्याप्रकरणी ७ आॅक्टोंबर २०१८ रोजी व्यारा पोलीस ठाण्यात तिच्या पालकांनी गुन्हा दाखल केला आहे. गुजरातमधील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात या मुलीच्याही अपहरणामुळे आणखी भर पडली. विविध राजकीय पक्षांनी आणि काही सामाजिक संघटनांनीही यातील आरोपीच्या अटकेसाठी व्यारा पोलीस ठाण्यावर जोरदार निदर्शने करीत मोर्चेही काढले. व्यारा येथे बंदही पाळण्यात आला. नागरिकांमध्ये मोठया प्रमाणात रोष निर्माण झाल्यामुळे वापीच्या आजूबाजूच्या शहरांमध्येही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या मुलीला मुंबई, ठाणे परिसरात पळवून आणल्याची शक्यता व्यक्त होत होती. व्यारा (गुजरात) पोलिसांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याशी संपर्क साधून याबाबत मदतीची मागणी केली. त्यानुसार ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त दिपक देवराज, सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांनी तात्काळ वेगवेगळी पथके वेगवेगळया ठिकाणी पाठविली. ही मुलगी गोवा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, हवालदार आनंदा भिलारे, महिला शिपाई निलम वाकचौरे तसेच व्यारा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एस. जी. राठोड यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करुन गोव्यातील पणजी शहरातून या मुलीची सुखरुप सुटका केली. तिचा अपहरणकर्ता हुजेफा यालाही ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. बुधवारी तिला गुजरात पोलिसांच्या मार्फतीने वापी येथे पाठविल्याचेही आयुक्तांनी सांगितले. गुजरात येथील तणावाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी मोठया कौशल्याने सुखरुपरित्या या मुलीची सुटका केल्याबद्दल गुन्हे अन्वेषण विभागाच्या संपूर्ण टीमचेही त्यांनी अभिनंदन केले.