अल्पवयीन मैत्रिणीचा इन्स्टाग्रामवर विनयभंग : ठाण्यातील दोघांची बालसुधारगृहात रवानगी
By जितेंद्र कालेकर | Published: October 12, 2018 10:05 PM2018-10-12T22:05:40+5:302018-10-12T22:36:03+5:30
अकरावीमध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी इन्स्टाग्रामवर एका १५ वर्षीय मुलीशी चॅटींग करुन नंतर तिच्याशी फोनद्वारे अश्लील संभाषण केले. याप्रकरणी या दोघांनाही नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ठाणे : पाचपाखाडी परिसरात राहणा-या एका पंधरावर्षीय शाळकरी मुलीशी इन्स्टाग्रामवर मैत्री करून वारंवार अश्लील संभाषण करून तिचा विनयभंग करणा-या १६ आणि सतरावर्षीय मुलांना ठाण्याच्या नौपाडा पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले असून दोघांची बालन्यायालयाने भिवंडीच्या बालसुधारगृहात रवानगी केली आहे.
पाचपाखाडीतील या मुलीशी इन्स्टाग्रामवर ठाण्यातील अकरावीमध्ये शिकणा-या एका मुलाशी ओळख झाली. त्याच्याशी चॅटिंग करतानाच त्याने कोपरीतील विनय (१७) आणि नौपाड्यातील प्रवीण (१६, दोघांच्याही नावात बदल केला आहे.) या आणखी दोन अकरावीतील आपल्या मित्रांशी तिची ओळख करून दिली. कालांतराने विनय आणि प्रवीण यांच्याशीही तिची चांगली मैत्री झाली, पण ते तिच्याशी अश्लील संभाषण करू लागले. वारंवार फोन करूनही तिच्या भावना चाळवल्या जातील, असे संभाषण त्यांनी सुरू केले. सुरुवातीला तिने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. पण, गेल्या एक महिन्यापासून हा प्रकार वाढतच गेल्याने तिने वडिलांच्या निदर्शनास हा प्रकार आणला. वडिलांनी त्यांचे संभाषण फोनवर रेकॉर्ड करून नौपाडा पोलीस ठाण्यात ११ आॅक्टोबर रोजी या दोघांविरुद्ध तक्रार दिली. पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या पथकाने या संपूर्ण प्रकरणाची पडताळणी करून कोपरी आणि नौपाड्यातून या दोघांनाही ताब्यात घेतले. अल्पवयीन असल्यामुळे त्यांना भिवंडीच्या बालन्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.