अल्पवयीन मुलीचा विनयभंग: आराेपीवर कडक कारवाईसाठी मनसेचा ठाण्यात माेर्चा

By जितेंद्र कालेकर | Published: October 17, 2024 09:17 PM2024-10-17T21:17:16+5:302024-10-17T21:17:30+5:30

अन्यथा ठाणे बंदचाही इशारा: राज ठाकरेंचीही पीडित कुटुंबीय घेणार भेट

Minor girl molested: MNS marches in Thane for strict action against RP | अल्पवयीन मुलीचा विनयभंग: आराेपीवर कडक कारवाईसाठी मनसेचा ठाण्यात माेर्चा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग: आराेपीवर कडक कारवाईसाठी मनसेचा ठाण्यात माेर्चा

जितेंद्र कालेकर (ठाणे), लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: भंडार आळीत एका ११ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिंदे सेनेचा उपविभागप्रमुख सचिन यादव याच्यावर कडक कारवाईसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह ठाणेकरांनी गुरुवारी माेर्चा काढला हाेता. हा माेर्चा ठाणे स्टेशन भंडार आळी ते मासुंदा तलावाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयापर्यंत काढण्यात आला हाेता. त्याच्याविरुद्ध मंगळवारपर्यंत अतिरिक्त कलमे लावून कारवाई झाली नाहीतर प्रसंगी ठाणे बंदची हाक दिली जाईल, असा इशाराही मनसेने यावेळी दिला.

गुरुवारी सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजेदरम्यान काढलेल्या या माेर्चामध्ये मनसेचे ठाणे, पालघर अध्यक्ष अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवी माेरे, महिला शहर अध्यक्षा समीक्षा मार्कंडे आणि उपाध्यक्षा मंजूळा डाकी यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्ते सहभागी झाले हाेते. अत्याचार करणाऱ्या आराेपीचा जामीन रद्द झालाच पाहिजे, आराेपीला कडक शिक्षा झालीच पाहिजे अशा घाेषणा यावेळी देण्यात आल्या. गेल्या आठवडयात भंडारआळी भागातील अल्पवयीन मुलीचा यादव याने विनयभंग केला हाेता. या घटनेनंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाणेनगर पाेलिसांनी त्याला अटकही केली. परंतू, दुसऱ्याच दिवशी ताे जामीनावर सुटल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्याच्यावर आणखी कठोर कलमे लावून पुन्हा अटक करावी, त्याचा जामीन रद्द करावा अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांनी केली. त्याच्याविरुद्ध मंगळवारपर्यंत अतिरिक्त कलमे लावून कारवाई झाली नाहीतर प्रसंगी ठाणे बंदची हाक दिली जाईल, असा इशाराही मनसेने यावेळी दिला.

या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप हाेत असल्याचा आरोप केला जात आहे.
 
राज ठाकरेंची पिडित कुटुंबीय भेट घेणार-
शुक्रवारी ठाण्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे येणार आहेत. त्यावेळी पीडित कुटुंबीय राज यांची भेट घेउन कैफियत मांडणार असल्याची माहिती मनसेचे रवी माेरे यांनी दिली.

Web Title: Minor girl molested: MNS marches in Thane for strict action against RP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MNSमनसे